नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी

द्वारका चौक वाहतूक कोंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक जटील होत असल्याने येथून वाहतूक करताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने, हा चौक केव्हा मोकळा श्वास घेणार, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहे.

सारडा सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोड, पंचवटी तसेच आडगाव या सर्वच भागांतून येणारे तब्बल नऊ रस्ते द्वारका चौकात मिळतात. त्यामुळे याठिकाणी रात्री ११ ते सकाळी ९ वाजेची वेळ सोडल्यास दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी बघावयास मिळते. विशेष म्हणजे चौकातील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असते. याशिवाय वाहतूक पोलिसांचाही मोठा फौजफाटा असतो, तरीही वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना दररोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे. या चौकातून सर्वच प्रकारची वाहने ये-जा करतात. नाशिकरोड, मुख्य शहरात व उपनगरात जाणारी मोठी वाहने नाशिक-मुंबई उड्डाणपुलावरून चौकात उतरत असल्याने कोंडीत भरच पडत आहे. सायंकाळच्या वेळी येथून मार्गक्रमण करणे खूपच अवघड होते. अर्ध्या तासाहून अधिक काळ या वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. विविध प्रयोग, नियोजन, बदल करूनही वाहतूक कोंडी जैसे थे असल्याने पोलिस, महानगरपालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

विशेषत: बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. रिक्षा तसेच द्वारका चौकात पार्किंग करण्यात येणाऱ्या खासगी वाहनांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. प्रशासनाने तत्काळ यावर लक्ष केंद्रित करून द्वारका चौकाचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

वाहतूक कोंडीची कारणे

– परिसरातील अतिक्रमणे अन् सर्कलचा मोठा आकार

– वाहने वळविण्यासाठी अपुरी जागा, अरुंद सर्व्हिस रोड

– चौकाच्या सर्व बाजूंना असलेली खासगी वाहने, रिक्षा थांबे

– भुयारी मार्ग वापराविना पडून

– वडाळा नाका चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे

मनपाच्या ॲक्शन मोडची प्रतीक्षा

द्वारका चौक परिसरात करण्यात आलेले अतिक्रमणदेखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. अशात महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतल्यास द्वारका चौकाचा श्वास मोकळा होण्यास काही अंशी मदत होऊ शकते. त्यामुळे मनपा केव्हा ॲक्शन मोडमध्ये येणार याची नाशिककरांना प्रतीक्षा आहे.

भुयारी मार्गाचा व्हावा वापर

सीबीएसप्रमाणे द्वारका भुयारी मार्गाचा वापर होणे आवश्यक आहे. याठिकाणी महापालिकेने गाळे तयार केल्यास बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर मनपाचा महसूल वाढू शकतो. मात्र सद्यस्थितीत या चौकातून काढण्यात आलेल्या भुयारी मार्गाला टाळे ठोकले असून, हा मार्ग वापराविना पडून आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : शहराच्या प्रवेशद्वाराचा श्वास होईना मोकळा, प्रशासन सपशेल अपयशी appeared first on पुढारी.