नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रारंभ

नाटक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डॉ. अमोल कोल्हे यांची चित्तथरारक घोडेस्वारी, संभाजी राजेंचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा, तडाखेबाज संवाद, तीन मजली भव्य-दिव्य किल्ल्याचा रंगमंच, 22 फुटी जहाजावरून केलेली जंजिरा मोहीम, छत्रपती संभाजी महाराज आणि अनाजी पंतांची जुगलबंदी, गनिमी काव्याने थेट प्रेक्षकांमधून केली जाणारी बुर्‍हाणपूर मोहीम, जिवंत तोफा या वैशिष्ट्यांसह हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र मांडणार्‍या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे उद्घाटन शनिवारी (दि.21) बाबूशेठ केला मैदान, तपोवन येथे करण्यात आले. महाराजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणेनिर्मित आणि जगदंब क्रिएशन आयोजित या महानाट्याचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये पार पडला.

या महानाट्यामध्ये डॉ. अमोल कोल्हे (छत्रपती संभाजी महाराज), गिरीश ओक (औरंगजेब), प्राजक्ता गायकवाड (महाराणी येसूबाई), महेश कोकाटे (अनाजी पंत), रमेश रोकडे (सरसेनापती हंबीरराव), अजय तपकिरे (कवी कलश), विश्वजित फडते (दिलेरखान व मुकर्रबखान) यांनी भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा भव्य-दिव्य इतिहास अडीच तासांच्या महानाट्यात मांडण्यात आला आहे. दि. 21 ते 26 जानेवारी दरम्यान या महानाट्याचा प्रयोग स्व. बाबूशेठ केला मैदान, साधुग्राम, तपोवन येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. महेंद्र महाडिक लिखित व दिग्दर्शित आणि डॉ. अमोल कोल्हे अभिनित या महानाट्याचे प्रयोग गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने महाराष्ट्रातील विविध शहरांसह महाराष्ट्राबाहेर गोव्यामध्येदेखील झाले आहेत. शिवशंभूंची प्रेरणा समस्त लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी हे महानाट्य अविरत काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या पसंतीस उतरलेले आशिया खंडातील एकमेवाद्वितीय भव्य-दिव्य महानाट्य तब्बल 15 वर्षांनी नाशिककरांच्या भेटीला आले आहेत. भावी पिढीला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कळावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी एकदा तरी हे महानाट्य पाहावे अशा भावना उपस्थिताकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये या महानाट्याची तयारी सुरू होती. यावेळी कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच जयप्रकाश जातेगावकरांनी पाहुण्यांचे स्वागत केले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खा. समीर भुजबळ, रवींद्र सपकाळ, अभिनेत्री सायली संजीव, शेफाली भुजबळ, कल्याणी सपकाळ, जयप्रकाश नानाजी निकुंभ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रारंभ appeared first on पुढारी.