नाशिक : शुभ मंगल सावधान… यंदा 58 मुहूर्त

विवाहाचे किमान वय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचा समारोप तुलसी विवाहाने होतो. तुलसी विवाहाला शनिवारी (दि. 5) प्रारंभ झाला. त्यानंतर लग्नसराईस प्रारंभ होत आहे. नोव्हेंबर ते जून या कालावधीत विवाहाचे 58 मुहूर्त असल्याने लग्नगाठी बांधण्यासाठी उत्साह आहे. यंदा लग्नसराईचा धूमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण आहे.

यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी (दि.5) ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत (दि.8) तुलसी विवाह साजरा करण्यात येत आहे. तसेच शनिवारी (दि. 5) शनिप्रदोष, शाकव्रत व चातुर्मास समाप्ती आहे. त्यामुळे येथून पुढील काळात मौंज तसेच लग्नसराईचे बार उडणार आहेत. त्यानुसार नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत तब्बल 31 विवाह मुहूर्त आहेत. त्यातही डिसेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत 10 मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये 2023 मध्ये गुरूचा अस्त असल्याने संपूर्ण महिन्यात विवाहाचा मुहूर्त केवळ 30 तारीखच आहे. तसेच मे व जून या दोन महिन्यांत विवाहाच्या 26 तिथी आहेत. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्षे लग्नसराईला काहीसा ब्रेक लागला होता. यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्तीमुळे सर्वच सण-उत्सव दणक्यात साजरे करण्यात आले. त्यानंतर विवाहांचा सिझन सुरू होत असून, लग्नासाठी तब्बल 58 मुुहूर्त आहेत. त्यामुळे भावी वधू-वरांसह त्यांच्या पालकांमध्ये उत्साह आहे. दरम्यान, यंदाच्या वर्षी दाट लग्नतिथी असल्याने पाल्यांचा विवाह मुहूर्त निश्चित करून त्यानुसार लॉन्स व मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल बुकिंगकडे पालकांचा ओढा आहे. विवाह सोहळे प्रारंभ होत असल्याने कापड व्यावसायिक, वाजंत्री, मंडप-डेकोरेटर्ससह एकूणच बाजारात उत्साह संचारला आहे.

परंपरा आजही टिकून…
वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी) पासून ते कार्तिक शुक्ल (देवउठनी) एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या काळात विवाह सोहळे, मौंजीला ब्रेक लागतो. यंदा देवउठनी एकादशी शुक्रवारी (दि. 4) सर्वत्र साजरी करण्यात आली. द्वादशीला तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्यात येतो. त्यानंतर विवाहाचे मुहूर्त काढण्याची परंपरा असून, आजच्या काळातही ती टिकून आहे.

यंदाच्या वर्षी नोव्हेंबर ते जून या कालावधीत विवाहाचे 58 मुहूर्त आहे. गुरूच्या अस्तामुळे 30 एप्रिल वगळता, संपूर्ण महिन्यात विवाह सोहळ्याच्या तारखा नाहीत. पाल्यांच्या विवाहाचे मुहूर्त काढून घेण्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. -नरेंद्र जोशी, गुरुजी.

महिनानिहाय विवाहाचे मुहूर्त असे…

नोव्हेंबर – 25, 26, 28, 29
डिसेंबर – 02, 04, 08, 09, 14, 16, 17, 18, 19
जानेवारी – 18, 26, 27, 31
फेब्रुवारी – 06, 07, 10, 11, 14, 16, 23, 24, 27, 28
मार्च – 09, 13, 17, 18
एप्रिल – 30
मे – 02, 03, 04, 07, 09, 10, 11, 12, 15, 16, 21, 22, 29, 30
जून – 01, 04, 07, 08, 11, 12, 13, 14, 23, 26, 27, 28

हेही वाचा:

The post नाशिक : शुभ मंगल सावधान... यंदा 58 मुहूर्त appeared first on पुढारी.