Nashik Crime : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने भावावर कोयत्याने हल्ला

कोयत्याने हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची संतपाजनक घटना मोरवाडी येथे घडली. भावाच्या मदतीला धावून गेलेल्या बहिणीवरही टोळक्याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. अंबड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील मोरवाडी गावाजवळ घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश गणेश भुजबळ (२१ रा. माणिकनगर, अंबड) यांची बहीण ब्युटीपार्लरचा क्लास करून घराकडे जात होती. यावेळी संशयित विशाल देवरे, नीलेश अहिरे, गौरव पेलमहाले व इतर तीन साथीदारांनी बुरकुले हॉलजवळ तिची छेड काढली. हा प्रकार बहिणीने घरी जाऊन भावास सांगितल्यानंतर भाऊ उमेश भुजबळसह ते संशयितांना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी मोरवाडी गावाजवळ संशयित विशाल देवरे व त्याच्या साथीदारांनी उमेशला मारहाण सुरू केली. यातील एकाने धारदार कोयत्याने कपाळावर, पोटावर तसेच कमरेवर वार केले. यावेळी भावाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या बहिणीवरही टोळक्याने हल्ला केल्याने यात ती जखमी झाली.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उमेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाला होता. यावेळी बहिणीने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिकांनी जखमी उमेश यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनिकेत हुले, नीलेश आहिरे, विशाल देवरे यांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अन्य दोन संशयित फरार असून, पुढील तपास अंबड पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Crime : बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने भावावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.