धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच मुंबई आग्रा महामार्गावरील टोल प्रशासनाच्या विरोधात आज आमदार फारुक शाह यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या आमदार शाह यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आ. शाह यांनी दिला आहे

राष्ट्रीय महामार्ग तसेच सोनगीर व अवधान टोल नाका प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात महामार्गाचे पाणी शहरात शिरून नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व अवधान व सोनगीर टोल नाका प्रशासन यांच्या कडे तत्काळ पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.तसेच चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल नसल्यामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. दोन्ही ठिकाणी नागरिकांना कुठल्याही सुविधा न देता वाहन चालकांकडून टोल प्रशासनाच्या माध्यमातून टोल आकारणी केले जाते. याविरोधात आ.फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिस

आमदार फारुख शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून उड्डाणपूल मंजुर करून घेतला आहे. परंतु आजपर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही. तसेच महाराष्ट्राच्या सीमेपासून ते नाशिकपर्यंत महामार्गाची व्यवस्था खराब झालेली आहे. त्यामुळे टोल प्रशासनाला टोल घेण्याचा अधिकार नाही. असा दावा यावेळी आमदार शाह यांनी केला. या सगळ्या मागण्या घेवून आज आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस आमदार फारुख शाह यांनी प्रशासनाच्या समोर आपल्या मागण्या मांडल्या. धुळे शहरा लगत इरकॉन सोमा टोलवे अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे पाणी महामार्गाने धुळे शहरात शिरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहराच्या नागरिकांची वित्त हानी होते. त्यामुळे ह्या पाण्याचा निचरा करण्यासाठी इरकॉन सोमा टोलवेमार्फत वेगळी ड्रेनेज पाईप लाईन करून पाण्याचा निचरा करण्यात यावा अशी मागणी यापूर्वी केलेली आहे. परंतु आजपर्यंत याची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच सुल्तानिया मदरसा येथील सर्विस रोडची व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. तसेच सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. तसेच धुळे शहरातील व वडजाई भागातील लोकांना त्याचा त्रास होतो. यापूर्वी सुद्धा दुतर्फा गटारीच्या कामासंदर्भात पत्र देवून सुद्धा काम झालेले नाही.

तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना चाळीसगाव चौफुलीवर होणारे ट्राफिक जाम आणि अपघातासंदर्भात पत्र देण्यात आले होते. त्यांनी लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात येईल. असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु झालेले नाही. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. टोलनाक्याच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांचा पी. आर. वर्फ गेल्या ४ वर्षां पासुन केलेला नाही. त्यामुळे शहरातील सबवे अत्यंत खराब झालेले आहेत. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे ते मालेगावपर्यंत रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. तसेच दुरुस्तीच्या नावाखाली रस्त्याची एक साईट बंद ठेवण्यात येते त्यामुळे या सहा महिन्यात अनेक अपघात झालेले आहेत. तसेच रस्त्याची साफसफाई होत नाही. टोल परिसरातील टॉयलेट, बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात घाण असते, साफसफाई केली जात नाही. तसेच प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. आम्ही अनेकदा टोल नाक्यावरून गेलो असता तक्रार पुस्तिका मागितली असता ती आढळून आली नाही. टोल भरणाऱ्या वाहन धारक व नागरिकांसाठी शौचालय व वॉशरूम उपलब्ध नाही.

माल वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांच्या पालकांसाठी व वाहकांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आलेली नाही, मोठया प्रमाणात टोल वसुली करूनही टोल प्रशासना कडून सर्वांना हाताशी घेऊन सुविधेची कामे टाळली जात असल्याचा आरोप आमदार शाह यांनी यावेळी केला.

शहरी हद्दीतील जवळ सर्व्हिस रोडची दुरावस्था झालेली असून त्या संपुर्ण परिसरामध्ये पथदिवे लावण्यात आलेले नाही. शहरी भागात पथदिवे नसल्याकारणाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोर, दरोडेखोर यांच्या सारख्या घातक विकृतींनी दोन लोकांचा खून करून त्यांच्या कडील ऐवज, रक्कम, सोने लुटुन नेण्याच्या घटना घडल्या आहेत. याच्या तक्रारी करून देखील याबाबत संबंधितांनी गंभीर दखल घेतली नाही. त्यानिषेधार्थ रस्ता रोको आंदोलन केले आहे. याची तत्काळ दखल घेण्यात यावी असे आमदार शाह म्हणाले.

आंदोलनात यांचा सहभाग 

या रस्ता रोको आंदोलनात सलीम शाह, भिखन हाजी शाह, नासिर पठाण, मुक्तार अन्सारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.दिपश्री नाईक, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साबीर सैय्यद, माजी नगरसेवक साजिद साई आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आंदोलन करणारे आमदार फारुख शाह यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दुपारनंतर या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

हेही वाचा :

The post धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको appeared first on पुढारी.