नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.9)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या चौकशीमुळे घंटागाडी ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांबाबत वारंवार तक्रारी होत असल्याचे समोर आल्यानंतर विभागीय आयुक्त तथा प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घंटागाडीच्या अनियमिततेसह दिलेल्या मार्गावरून घंटागाडी न धावणे, घंटागाड्यांची संख्या कमी असणे, जीपीएस यंत्रणा न बसविणे, ओला व सुक्या कचर्‍याचे विलगीकरण न करणे तसेच करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे घंटागाड्या नसणे आदींबाबतची सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार समिती स्थापन करून समितीकडून ऑन फिल्ड चौकशीस प्रारंभही केला आहे. समितीत वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी तसेच घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील कचरा संकलनासाठी 154 कोटींचा ठेका थेट 354 कोटींवर गेल्यापासून हा ठेका वादग्रस्त व चर्चेत आहे. केरकचरा संकलन ठेक्याच्या रकमेत दुपटीने वाढ केल्यानंतरही घंटागाडीचा तंटा कायम राहिला आहे. 1 डिसेंबरपासून शहरात 396 घंटागाड्या सुरू झाल्या असून, काही ठेकेदारांकडून लहान घंटागाड्यांचा वापर केला जात आहे. घंटागाडी अनियमिततेच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग त्यास दाद देत नसल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्त गमेंकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

घंटागाड्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीकडून पुढील एक ते दीड आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. सध्या याबाबतची सखोल चौकशी केली जात आहे. – उदय धर्माधिकारी, चौकशी समितीप्रमुख, ऑन फिल्ड समिती.

हेही वाचा:

The post नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी appeared first on पुढारी.