नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला

सायबर गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. त्यातच आता गहाळ मोबाइलचा समावेश होत आहे. गहाळ झालेल्या मोबाइलचा वापर करून चार खातेधारकांनी युवकाच्या २२ लाखांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरट्यांनी मोबाइलचा डेटा वापरून युवकाची ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी चार अनोळखी बँक खातेधारकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कीर्तीकुमार शहा (३०, रा. राजमंदिर सोसायटी, क्रांतीनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) याचा २६ ते २७ मार्च या कालावधीत पंचवटीतल्या गोदा पार्कजवळ मोबाइल गहाळ झाला. त्यानंतर हळूहळू त्यांच्या बँकेतून काही रक्कम परस्पर इतर बँक खात्यांमध्ये वळती होण्यास सुरुवात झाली. तब्बल २१ लाख ६९ हजार रुपये गायब झाल्यानंतर फसवणूक होत असल्याचे आकाश यांच्या लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली.

शहा यांच्या फिर्यादीवरून एका खासगी बँकेतील चार बँक खात्यांच्या क्रमांकानुसार त्याच्या वापरकर्त्यांविरोधात सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून संशयितांसंदर्भात माहिती मागवली आहे. दरम्यान, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी मोबाइल गहाळ झाल्यानंतर त्यातील सिमकार्ड तत्काळ बंद करून तक्रार नोंदविण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : सायबर चोरट्यांचा नवा फंडा, गहाळ माेबाइलचा वापर करून २२ लाखांवर डल्ला appeared first on पुढारी.