नाशिक : हरिहर भेट महोत्सव रंगला; ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी

harihar bhet www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि बम बम भाेलेच्या गजरात रविवारी (दि ६) रात्री श्री कपालेश्वर मंदिर आणि श्री सुंदर नारायण मंदिरात हरिहर भेट सोहळा रंगला.

देव दिवाळीनिमित्त श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शनिवारी (दि. ५) हरिहर भेट सोहळ्याला प्रारंभ झाला. यात भगवान विष्णू व महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना व पूजन करण्यात येऊन महाविष्णू याग संपन्न झाला. मंदिर परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रविवारी रात्री श्री कपालेश्वर मंदिरातून मोठ्या जल्लोषात बेलपान व पादुका श्री सुंदर नारायण मंदिरातून तुळशीपत्र कपालेश्वर मंदिरात आणण्यात आले. यासाठी कपालेश्वर महादेवाची मंदिरातील पिंड हरिहर रुपात म्हणजे भगवान विष्णू आणि शिव अर्धांगी रुपात सजविण्यात आली होती. याप्रसंगी भाविकांच्या उपस्थितीत ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व महादेवाच्या जयघोषात रात्री उशिरापर्यंत हरिहर भेट सोहळा रंगला.

गेली दोन वर्षे कोरोना काळातील निर्बंधांमुळे हरिहर भेट महोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे कपालेश्वर मंदिरात विश्वात सुख-शांती, समृद्धी नांदावी, कोरोना महामारी संकट पूर्णपणे नष्ट व्हावे, यासाठी हरिहर भेटीनिमित्त महाविष्णू याग केला जात आहे. रविवारी (दि. ६) रोजी महाविष्णू यागाची पूर्णाहूती, चातुर्मास समाप्तीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. कपालेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर दररोज वेगवेगळी आकर्षक सजावट करून देवाला साजशृंगार करण्यात येत आहे. यावेळी महाविष्णू यागाचे पप्पू गाडे यांनी सपत्नीक पूजन केले असून, अमोल साकोरकर, प्रसाद साकोरकर, अजिंक्य प्रभू , सौरभ गायधनी, श्रीराम नाचण, रोहित सुंठवाल, राहुल बेळे यांनी पौरोहित्य केले.

हेही वाचा:

The post नाशिक : हरिहर भेट महोत्सव रंगला; ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी appeared first on पुढारी.