नाशिक : ९८ जुन्या वाहनांतून महापालिकेला मिळणार ‘इतके’ लाख

मनपाची जुनी वाहने,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या ताफ्यातील तब्बल ९८ लहान-मोठ्या वाहनांचा दीड महिन्यांपूर्वी झालेल्या लिलावातून ६७ लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. पंधरा वर्ष जुने असलेल्या सर्व वाहनांची नोंदणी रद्द करून ते भंगार केंद्रावर नष्ट करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच मनपाने घेतला होता, त्यानुसार या वाहनांची लिलाव प्रक्रियेतून विक्री करण्यात आली.

१ एप्रिलपासून अंमलात आलेल्या नवीन नियमांप्रमाणे केंद्र सरकारची वाहने, सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश सरकार, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, राज्य परिवहन, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह सरकारी अनुदानीत संस्थांची पंधरा वर्षे जुनी वाहने भंगारात विक्रीस काढली जाणार आहेत. दरम्यान, नाशिक महापालिकेने याबाबत लिलाव प्रक्रिया राबवून जुन्या वाहनांची विक्री केली. यापूर्वी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने दोन वेळा जुन्या वाहनांच्या लिलावासाठी प्रयत्न केले होते. मात्र, अल्पदराची बोली मिळत असल्याने जुनी वाहने तशीच पडून होती. नाशिक महापालिकेकडून सध्या छोटी-मोठी २२५ वाहने असून, अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांसाठी या वाहनांचा वापर केला जातो. तसेच वॉटर टँक, मालवाहतुकीसाठी छोट्या गाड्या, ट्रॅक्टर, कार, जेसीबी आदी वाहनेही आहेत. दरम्यान, जुन्या वाहनांचा लिलाव केल्याने पालिकेला आता नवीन वाहने खरेदी करावी लागणार आहेत.

दीड महिन्यापूर्वी ९८ वाहनांचा निलाव करण्यात आला असून, त्यातून पालिकेला ६७ लाख रुपये मिळ्णार आहे. लवकरच ही रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त होईल.

– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग

हेही वाचा : 

The post नाशिक : ९८ जुन्या वाहनांतून महापालिकेला मिळणार 'इतके' लाख appeared first on पुढारी.