नाशिक : 20 किमी आतील गावांना टोलमध्ये सूट नसल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

shirdi tol www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र.160 वरील रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच शुक्रवारी (दि. 7) मध्यरात्री वावी गावाजवळील पिंपरवाडी शिवारातील टोलनाका कार्यान्वित करण्यात आला आहे. यामध्ये वावीसह परिसरातील 20 किमीच्या आतील गावे वगळून टोलवसुली सुरू करायला पाहिजे होती. मात्र स्थानिक गावांना यामध्ये कुठलीही सवलत न देता सरसकट टोलवसुली करण्याचे धोरण कंपनीने अधिकृत केल्यामुळे वावीसह परिसरातील गावातील नागरिकांनी मात्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सिन्नर – शिर्डी महामार्गावरील सिन्नर गुरेवाडी फाटा ते शिर्डी सावळीविहीर फाटा हे 50 किलोमीटर अंतरावरील रस्ता रुंदीकरणाचे काम सरासरी 85 टक्के पूर्ण झाले आहे. वावी गावाजवळ सर्व्हिसरोडचे काम अपूर्णावस्थेत आहे. या कामाला केव्हा मुहूर्त लागेल याची मात्र वावीकरांना शंकाच आहे. 20 किलोमीटरच्या आतील रहिवास असणार्‍या स्थानिक ग्रामस्थांसाठी टोलवर जा-ये करण्यासाठी 330 चा पास मासिक रूपाने देण्यात येणार आहे. यामध्ये व्यवसाय करणार्‍या यलो बोर्ड (नंबर प्लेट) असणार्‍या पासिंग गाड्यांसाठी कुठल्याही प्रकारे पासची सुविधा उपलब्ध नाही. एमएच 15 अर्थात नाशिक जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना यामध्ये सवलतीचा दर देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. चारचाकी, कार वाहनांसाठी जिल्हा अंतर्गत येणार्‍या वाहनांसाठी 40 रुपये, तर जिल्ह्याबाहेरील कार वाहनासाठी 75 रुपये मोजावे लागणार आहेत.

टोलनाका परिसरातील वावी हे दळणवळणाच्या दृष्टिकोनातून मोठे गाव असल्यामुळे शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकर्‍यांची ये-जा होत असते. त्यामुळे वावीच्या बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. शेतकर्‍यांसह स्थानिकांना संपूर्ण रकमेतून टोल फ्री करावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. -संतोष जोशी, तालुका उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी.

पिंपरवाडी शिवारातील टोलनाका वसुलीसाठी एकूण 16 लेन कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यापैकी 14 लेन या फास्टॅग असून दोन लेन कॅशलेस आहे. मोंटो कार्लो कंपनीच्या सहायाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने हा टोल जरी तीन महिने ट्रायल स्वरूपात दिला असला, तरी स्थानिकांना मासिक पास न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक वावीसह परिसरातील गावांना कुठल्याही प्रकारचा पास न देता आधार कार्ड दाखवून संपूर्ण टोल माफी करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. यामध्ये कुठलाही बदल न केल्यास वावीसह परिसरातील 25 ते 30 गावांतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या महामार्गाच्या कामात वावी गावासह महामार्गालगतच्या अनेक शेतकर्‍यांची जमीन संपादित झाली. गावातील काही व्यावसायिक उघड्यावर आले. आर्थिक दळणवळण बिघडल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला. तरीसुद्धा सर्वांनी सहकार्य केले. या टोलप्लाझा कंपनीचा 330 रुपयांचा पास स्थानिकांसाठी नको होता. स्थानिकांसह 20 किमी आतील लोकांना आता संपूर्ण टोलमाफीसाठी आंदोलन करावे लागणार आहे. -विजय काटे, माजी सरपंच वावी.

टोलचे दर : कार, जीप,व्हॅन, एलएमव्ही प्रकारातील वाहनासाठी 75 रुपये एकेरी फेरी, तर एकाच दिवसातील दुहेरी फेरीसाठी 115 रुपये आकारणी केली जाईल. एसएलव्ही, एलजीव्ही, मिनीबस वाहनासाठी 125 रुपये, बस ट्रककरिता 260 रुपये, तीन एक्सल कमर्शियल वाहनासाठी 285 रुपये, चार ते सहा एक्सल वाहनांसाठी 410 रुपये, सात किंवा अधिक एक्सलच्या अवजड वाहनासाठी 500 रुपये असे एकेरी फेरीचे शुल्क असणार आहे.

महामार्गावर टोलनाका कार्यान्वित झाला असला तरी या परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या आहे. त्यांना पाहिजे तसा मोबदला नाही मिळाला. स्थानिक नागरिकांना या टोलवर प्राधान्याने नोकरी द्यावी. 20 किमी परिसराबाहेरील कर्मचारी कार्यान्वित झाल्यास आमच्या पुढे आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. -बाबा कांदळकर, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

 

The post नाशिक : 20 किमी आतील गावांना टोलमध्ये सूट नसल्याने नागरिकांचा आंदोलनाचा इशारा appeared first on पुढारी.