निसर्गसौंदर्याची उधळण : भंडारदरा-कळसूबाई परिसर रानफुलांनी बहरला

रानफुले www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे
निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण झालेल्या व निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या भंडारदरा परिसरात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये अनोखे चमत्कार पर्यटकांना पाहावयास मिळतात. सप्टेंबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत रानभेंडी, कारवी, टोपली कारवी, तेरडा, कळलावी, सोनकी, घडहान, दिवटा, धोटा, बफळी, आंबू, पलदा तसेच पिवळ्या रंगाची सोनकी व खुरसणीची फुले घाटघर, रतनवाडी, भंडारदरा परिसरातील हिरव्यागार डोंगरदर्‍यात रानात पसरल्याने निसर्गसौंदर्यात अधिक भर पडली असून, पर्यटकांना आकर्षित करू लागली आहे.

पावसाचा जोर काहीसा कमी होतो. सगळीकडे पावसाने राज्य केल्यामुळे हिरवळीने सह्याद्रीची पर्वतरांग नटून बसली आहे. हिरवाकंच दिसणार्‍या या हिरवळरूपी शालूला आता रानफुले व गवतफुलांनी झालर बसविली आहे. निसर्गाची अलौकिक देण असलेली फुले कळसूबाईच्या शिखरावर तसेच रतनगडाच्या सभोवताली थाटात डोलत आहेत. सोनकळीच्या फुलांनी संपूर्ण जंगलालाच सोन्याचा मुलामा चढविल्यागत भास होताना दिसत आहे. भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक प्रकारची गवतफुले व रानफुलेही उगवली असून, निसर्गाचा हा अद्भुत देखावा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. रतनगडाच्या पायथ्याचा संपूर्ण परिसर रानफुलांनी बहरून गेला आहे. तर आशिया खंडातील सर्वांत मोठी दरी समजल्या जाणार्‍या सांदन दरीचा आनंद घेण्यासाठी आलेले शेकडो पर्यटक या फुलांची मनमोहक अदा आपल्या कॅमेर्‍यात टिपत आहेत. फुलांमध्ये कारव्यासारख्या झाडाला सात वर्षांतून एकदाच फुले येत असून, या कारवीच्या झाडांचा उपयोग घरबांधणीसाठी व वाळल्यानंतर सरपणासाठी केला जातो. यामध्ये काही फुलांचा वापर हा ठरावीक आजारावर औषधांसाठी केला जातो. रिंगरोडवर पर्यटन करताना कितीतरी लहान लहान मुले हातात रानफुले घेऊन पर्यटकांना खरेदीसाठी आग्रह करताना दिसत आहेत. जसे भंडारदरा परिसरात पावसाळ्याअगोदर काजवा महोत्सव व पावसाळ्यातील जलोत्सवाला पर्यटकांची तुफान गर्दी होते, अशीच पर्यटकांची साथ पुष्पोत्सवाला मिळाली तर भंडारदरा महाराष्ट्रातील दुसरे कास पठार म्हणून ओळखले जाईल, असे मत निसर्गप्रेमींतून व्यक्त होत आहे.

सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कळसूबाई परिसरातील डोंगरदर्‍या विविध प्रकारच्या रानफुलांनी फुलून जातात. हे द़ृश्य डोळ्यांना सुखावणारे असते. अनेक पर्यटक दूरदूरहून फुलांचा आनंद घेण्यासाठी या परिसराला भेटी देत असतात. – नितीन शहा, स्थानिक नागरिक, भंडारदरा

हेही वाचा:

The post निसर्गसौंदर्याची उधळण : भंडारदरा-कळसूबाई परिसर रानफुलांनी बहरला appeared first on पुढारी.