पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तीन ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि. १३) रात्री गंभीर अपघात झाला. या अपघातात पुण्याकडून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने रस्ता क्रॉस करणाऱ्या १७ महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात चार ते पाच महिला रस्त्यावर पडुन अक्षरशः चिरडल्या गेल्या. यातील दोन जागीच ठार झाल्या तर एका महिलेचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. उर्वरितांपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक आहे, तर १३ महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सुशीला देढे या जागीच ठार झाल्या आहेत. इंदूबाई कोंडीबा कांबळे (वय ४६, किरकट वाडी,पुणे) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातातील मयत व जखमी हे अपघात स्थळापासून जवळच असलेल्या कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी आल्या होत्या. पुण्यातील स्वारगेट, खडकवासला , किरकटवाडी, रामटेकडी परीसरातून कृष्णपिंगाक्ष कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी (केटरिंग) या महिला आल्या होत्या. पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे या सर्वजणी खाली उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता क्रॉस करताना त्या घोळक्याने जात होत्या, दरम्यान पुणेकडून वेगाने येत असलेल्या चारचाकी वाहनाने सर्वांना जोरदार धडक दिली.

रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा ओरडा झाला. रस्त्यावर रक्ताची थारोळी साचली. नेमके याच वेळी पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले येथूनच निघालेले होते. त्यांनी पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा

The post पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तीन ठार; महिलांच्या घोळक्यात शिरली चारचाकी appeared first on पुढारी.