प्रधानमंत्री पीक विमा योजना | फक्त १ रुपयात पीक विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; येथे करता येईल अर्ज

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

सुनिल थोरे

पुढारी वृत्तसेवा, चांदवड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला खरीप २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. नियुक्त करण्यात आलेली आहे. खरीप हंगामात बाजरी, मका, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. (Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY)

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतिम मुदत आणि हप्ता किती? Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविन्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ रु. १/- विमा हप्ता भरावयाचा आहे. या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सर्व आपत्तींचा समावेश | Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY

या योजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, भू-सख्खलन, पावसातील खंड, किड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबीमध्ये समाविष्ट केलेली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढनी पश्चात नुकसान यांचा जोखमीच्या बाबींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

कोणकोणत्या पिकांचा समावेश?

सर्व प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम २०२३-२४ करिता पीक निहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षीत रक्कम प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे – बाजरी – विमा संरक्षीत रक्कम ३०,०००/-
मका – विमा संरक्षीत रक्कम रु.३५,५९८/-
मुग – विमा संरक्षीत रक्कम रु.२०,०००/-
उडीद – विमा संरक्षीत रक्कम रु.२०,०००/-
भुईमुग – विमा संरक्षीत रक्कम रू.४२,९७१/-
सोयाबीन – विमा संरक्षीत रक्कम रु.४९,५००/-
खरीप कांदा – विमा संरक्षीत रक्कम रु.८१,४२२/-

भरपाईची प्रक्रिया कशी असते?

पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२ तासांच्या आत पीक विमा ॲप, कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे लागणार आहे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अतंर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिकांस विमा संरक्षण मिळणेसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे व पिक विमा भरण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा राष्टीयकृत बँकेशी संपर्क साधावा असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.  शेतकरी महा ई सेवा केंद्र,सामुदायिक सुविधा केंद्र,ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र,राष्ट्रीयकृत बँका येथून पीक विमा काढू शकतील.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आवश्यक असलेली कागदपत्रे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पिक परेणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकीत प्रत सादर करणे आवश्यक असणार आहे.

पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणेसाठी शेतकरी हिस्सा रक्कम रु.१/- इतकी नाममात्र असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे व आपल्या पिकाचा विमा काढून घ्यावा. – विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, चांदवड. 

हेही वाचा

The post प्रधानमंत्री पीक विमा योजना | फक्त १ रुपयात पीक विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; येथे करता येईल अर्ज appeared first on पुढारी.