प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार?

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या २ जून रोजी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबतचा सस्पेन्स २२ दिवसांनंतरही कायम आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी भाजप-सेनेत सुरू असलेली चढाओढ थांबता-थांबत नसल्याने महापालिका आयुक्तांची खुर्ची आणखी किती काळ रिकामी ठेवली जाणार, असा प्रश्न आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

आगामी महापालिका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आयुक्तपदी आपल्याच मर्जीतील अधिकारी असावा, यावरून सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. त्यासाठी आजी – माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने २२ दिवसांनंतरही याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. आतापर्यंत आयुक्तपदासाठी भाजप-सेनेच्या मर्जीतील अनेक अधिकाऱ्यांची नावे समोर आली. त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, फिल्मसिटीचे संचालक डॉ. अविनाश ढाकणे, कामगार खात्याचे संचालक अशोक करंजकर, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आदींच्या नावांचा समावेश आहे. यातील मनीषा खत्री या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या गुडबुकमध्ये असल्याने त्याच नाशिक महापालिका आयुक्तपदी येतील, असा कयास लावला जात होता, तर अनिलकुमार पवार हे पालकमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे नाव आयुक्तपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र आता या सर्व चर्चा शांत झाल्या असून, आयुक्तपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, आयुक्त निवडीवर सध्या भाजप-सेनेच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्यानेच आयुक्त निवडीचा निर्णय लांबत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी आयुक्त निवडीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत आयुक्त निवडीच्या फाइलवर सह्या होणार असल्याचे सांगितले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजी-माजी पालकमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नावे लावून धरल्यानेच नाशिक महापालिका आयुक्तपदाचा निर्णय लांबणीवर पडत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या नाशिक महापालिकेचा कारभार ‘प्रभारी’ सांभाळत असून, नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त केव्हा मिळणार, हा प्रश्न आता नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी पदासाठी ‘लॉबिंग’
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचीदेखील केव्हाही बदली होण्याची शक्यता असल्याने, जिल्हाधिकारी पदासाठी जोरदार लॉबिंग केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी पदावरूनदेखील आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये एकमत होत नसल्याने, गंगाथरन डी. यांच्या बदलीचा निर्णय ताटकळत ठेवला होता. जिल्हाधिकारी पदासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, तत्कालीन आदिवासी आयुक्त तथा दुग्धविकास आयुक्त मुंबई हिरालाल सोनवणे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शिनगारे आदी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा:

The post प्रभारी कारभार : भाजप- सेनेत जमेना, कोणाची वर्णी लागणार? appeared first on पुढारी.