फार्मा स्टॉकमधील रॅलीत दडलेय अनेक संकेत

गुंतवणुकीच्या विश्वात www.pudhari.news

नाशिक : राजू पाटील

एप्रिल महिन्याच्या मध्यापासून अमेरिकेच्या कज मर्यादा निधीबाबत सुरु झालेल्या चर्चेने शेअरबाजारात आलेल्या अस्थिरतेत फार्मा कंपन्यांच्या समभागांनी जोरदार रॅली दाखवत सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. कोरोनाची लाट आल्यानंतर २०२१ मध्ये सर्वात जोरदार रॅली दाखविणारे फार्मा स्टॉकची २०२२ च्या मध्यापासून काहीशी दमछाक सुरु झाली होती. गतवर्षी एप्रिलनंतर अनेक फार्मा स्टॉकने उलटप्रवास सुरु करत अनेक गुंतवणूकदारांना उच्च पातळीवर अडकविले होते. विदेशी वित्तसंस्थांनी फार्मा स्टॉकमध्ये जबरदस्त गुंतवणूक करत २०२१ मध्ये अनेक फार्मा स्टॉकला लाईफटाईम हाय अर्थात उच्चांकी पात‌‌ळीवर नेऊन बसविले होते. लॉरस लॅब सिप्ला, ल्युपिन, ऑरो, शिल्पा मे़डिकेअर यासारखी अनेक उदाहरण आहेत. २०२२ च्या एप्रिलपासून उच्चांकी पातळीपासून फार्माच्या अनेक कंपन्यांनी घसरणीच्या दिशेने प्रवास सुरु केल्याने गुंतवणूकदार निराश झाले होते. साधारण वर्षभर थंड असलेल्या फार्मा कंपन्यांनी मे महिन्यात अचानक मुसंडी मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

फामा कंपन्यांनी रॅली का दाखविली ? या प्रश्नाचे उत्तर आता शोधले जात आहे. मुळात गत जूनपासून अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदर वाढीचा धडाका सुुरु केल्याने अनेक फार्मा कंपन्यांनी आपल्या विस्तारीकरण योजनांना ब्रेक देत भांडवली खर्च आटोक्यात ठेवण्यावर भर देण्याचे संकेत दिले. त्यामुळे या क्षेत्राबाबत काहीशी नकारात्मक भावना निर्माण झाली. त्यातच तीन ते चार दिग्गज कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीतील निकाल फ्लॅट आल्याने या नकाराच्या सुरात आणखी भर पडली. परिणामी विदेशी वित्तसंस्थांनी भारतातून भांडवल काढून घेण्याचा सपाटा सुरु करताना पहिल्यांदा फार्मा कंपन्यांमधील आपली गुंतवणूक कमी केली. परिणामी दिग्गज फार्मा कंपन्यांची पडझड २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत पहायला मिळाली.

मार्जिनमध्ये जबरदस्त वाढ

मार्चअखेर संपलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतातील टॉप टेन फार्मा कंपन्यांनी आपले निकाल जाहीर करताना मार्जिनच्या प्रमाणात घडवून आणलेली सुधारणा थक्क करणारी होती. सन फार्मा, आरपीजी लाईफ सायन्स, ग्लेनमार्क या कंपन्यांनी तर जबरदस्त कामगिरी जाहीर करताना आगामी कालावधीसाठीसुध्दा उत्तम कामगिरी राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. अनेक फार्मा कंपन्यांच्या गत तीन आठवड्यात पार पडलेल्या ॲनॅलिस्ट मीटमध्ये उलाढाल तसेच नफ्याच्या प्रमाणात वाढ होण्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यामुळे विदेशी वित्तसंस्थांनी अतिशय माफक पातळीवर उपलब्ध असलेल्या या स्टॉकचा आपल्या पोतडीत भरणा सुरु केला. त्यामुळे या क्षेत्रात तुफान रॅली सुरु झाली. ट्रेंड रिर्व्हसलचा हा पहिला संकेत होय.

सुरक्षेची हमी

मुळात सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे फार्मा सेक्टर शेअरबाजार सध्याच्या उच्च पातळीवर असताना आणखी सुरक्षित ठरले आहे. अनेक फार्मा कंपन्यांच्या समभागांची किंमत योग्य पातळीवर असून त्या स्वस्त आहेत. बाजारात आगामी महिनाभरात पडझड झाली तरी या क्षेत्रातील पडझड मर्यादीत राहून गुंतवणूक सुरक्षित राहिल, असाही होरा आहे.

जागतिक पातळीवर तुर्तास अमेरिकीतील संभाव्य मंदीबाबत अद्यापही अनिश्चितता असताना फेडरल बँकेने व्याजदर वाढीला ब्रेक देणार असल्याचे संकेत दिल्याने फार्मा क्षेत्राला प्रचंड दिलासा मिळाला आहे. परिणामी भांडवली खर्च आटोक्यात राहणार आहे. त्यातच युरोपातील मंदीचा भारतीय फार्मा उद्योगाला फायदा होणार आहे. तेथील मंदीमुळे भारतीय फार्मा कंपन्यांचे आगामी सहामाहीतील निर्यातीचे आकडे चमकदार राहणार असल्याचा अंदाज अनेक ब्रोकींग फर्मनी व्यक्त केला आहे. निर्यात चमकदार राहिल्यास फार्मा कंपन्यांचे मार्जिन उत्तम राहणार असल्याने आघाडीच्या फार्मा कंपन्यांत रॅली सुरु झाल्याचे संकेत मेच्या शेवटच्या आठवड्यात मिळाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक अतिशय फायदेशीर होत चालली आहे. ऑरो, बायोकॉन, झायडस, सिप्ला, ल्युपीन, ग्लेनमार्क, सन फार्मा यांच्या रॅली हेच संकेत देत आहेत. आगामी सहा महिने फार्मा स्टॉक हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. हे संकेत चाणाक्ष गुंतवणूकदारांनी ओळखले असून विदेशी फंडांबरोबर भारतीय मुच्यूअल फंडांनीही जोरदार खरेदी सुरु केली आहे. परिणामी फार्मा स्टॉकमध्ये तेजीचे वारे जोरदार वाहत आहे.

The post फार्मा स्टॉकमधील रॅलीत दडलेय अनेक संकेत appeared first on पुढारी.