बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथून मुंबईकडे बनावट मद्य तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे कंटेनरला गुजरातचा बनावट क्रमांक लावून ही तस्करी होत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील सोनगीर नजीक झालेल्या या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कारवाई करणारे पथक उपस्थित होते. दिल्ली येथून एका कंटेनर मध्ये मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी धुळे मार्गे होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक योगेश राऊत व बाळासाहेब सूर्यवंशी तसेच दिलीप खोंडे ,श्रीकांत पाटील ,प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, संतोष हिरे, प्रकाश सोनार ,मयूर पाटील ,राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी आदी पथकाने महामार्गावर गस्त सुरू केली.

या पथकाने शिरपूरकडून येणारा जी जे ०८ ए यु २३५८ क्रमांकाचा कंटेनर थांबवला. या कंटेनरच्या चालक रमेश मुंशीराम कुमार याला याच्याकडे चौकशी सुरू केली. यावेळी या चालकाने पोलीस पथकाला उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्याचप्रमाणे कंटेनर मध्ये असलेल्या मालाची कागदपत्रे देखील त्याच्याकडे नसल्याची बाब निदर्शनास आली.

हा कंटेनर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात आणून तपासणी केली असता त्यात विदेशी बनावटी मद्य आढळून आले. कंटेनरमधून वेगवेगळ्या व्हिस्कीचे एकूण ३७० बॉक्स जप्त केले. तसेच दहा लाखाचा कंटेनर असा ३१ लाख २२ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दारूच्या तस्करी प्रकरणात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हा माल कुठून आणला व त्याची विल्हेवाट कोठे होणार होती. याचा तपास सुरू करण्यात आला आहे. मद्य तस्करीच्या या साखळीत आणखी कोण आरोपी आहेत, याबाबत चालकाकडून विचारपुस सुरू झाली आहे.

हेही वाचा;

The post बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.