महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड

वीजचोरी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महावितरण नाशिक परिमंडळात वीजचोरी विरोधात राबविलेल्या मोहिमेत 222 ग्राहकांवर कारवाई करत तब्बल दोन लाख 50 हजार युनिटची वीजचोरी उघड केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वीजचोरीचे सर्वाधिक प्रकार उघडकीस आणले आहे.

वीजचोरीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत परिमंडळांतर्गत नाशिक, मालेगाव व नगर मंडळात ज्या फीडर्समध्ये वीजहानी 50 टक्क्यांपेक्षा जास्त होती, तेथे तोटा 20 टक्क्यांपेक्षा कमी करण्याची जबाबदारी अभियंत्यांना सोपविण्यात आली. तसेच ज्या फीडर्समध्ये नुकसान 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते ते 15 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे काम होते. त्यासोबत अभियंत्यांना प्रत्येक ठिकाणी भेट देत वीजगळतीची कारणे शोधण्यास सांगण्यात आले. तसेच परिमंडळातील ग्राहकांना ज्या कारणाने वीज घेतली त्यासाठीच त्याचा वापर होतो का याचा ही शोध घेण्यात आल्याचे एका अधिकार्‍याकडून सांगण्यात आले. महावितरणच्या तीन महिन्यांच्या विशेष मोहिमेत काही ग्राहकांनी वीज टॅपिंगचे तसेच मीटरमध्ये छेडछाड केल्याचे प्रकार समोर आले. त्यामध्ये 222 ग्राहकांनी केलेली अडीच लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक 169 ग्राहकांनी 1 लाख 90 हजार युनिटची वीजचोरी करताना आढळून आले. त्या खालोखाल मालेगाव मंडळात 49 ग्राहकांची 57,133 युनिटची वीजचोरी उघडकीस आली. तसेच नाशिक परिमंडळात चार ग्राहकांनी 1 हजार 662 युनिट वीजचोरी करताना पकडल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

मोहीम सुरूच राहणार
विजेचे कनेक्शन घेताना ग्राहकांनी अधिकृतरीत्याच घ्यावे. तसेच वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. परिमंडळातील अभियंत्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात शून्य वीजचोरी सुनिश्चित केली असून, त्यानुसार अचानक छापे टाकले जातील, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post महावितरणची राज्यभर मोहीम : परिमंडळात 2.5 लाख युनिटची वीजचोरी उघड appeared first on पुढारी.