महिला दिन विशेष : एकल विधवा महिलांचा सन्मान

विधवा महिला www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

येथील समर्थ महिला मंडळ व दिंडोरी तालुका एकल महिला संघटनेच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त विधवा, एकल महिला व स्वयं रोजगाराचे प्रशिक्षण घेतलेल्या युवतींचा सत्कार करण्यात आला.

समर्थ महिला मंडळाच्या संचालिका नगमा शेख व एकल महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्शवत महिलांचा सत्कार, सन्मान करण्याबरोबरच विविध उपक्रम राबविले जाते. पतीच्या मृत्युनंतर मुलांच्या पालन पोषणाबरोबरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी डोक्यावर घेवून प्रतिकूल परिस्थितीत हिम्मत न हारता मोठ्या कष्टाने कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच नेहरु युवा केंद्राच्या माध्यमातून पंचवीस युवती, महिला यांना शिवणकामाचे तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण देवून स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. यांचाही सत्कार नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी कमल त्रीपाठी, समर्थ महीला मंडळाच्या संचालिका नगमा शेख, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता जाधव, दिगंबर पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकल व विधवा महिलांच्यावतीने हुसेना अखलाख शेख, ताराबाई सुरेश पवार सखुबाई पारेगाव यांनी मनोगत व्यक्त करीत समर्थ महिला मंडळाच्या माध्यमातून स्वंयरोजगार मिळाल्याने कुटुंबाची विस्कटलेली घडी कशी यशस्वीरित्या रुळावर आणली याबाबत आभार मानले. नगमा शेख यांनी प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत केलेश. सुनिता जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post महिला दिन विशेष : एकल विधवा महिलांचा सन्मान appeared first on पुढारी.