रविवार विशेष: सिव्हीलमधील भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचे आव्हान

Corruption www.pudhari.news

एक शून्य शून्य : गौरव अहिरे

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्राचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर रुग्णसेवा देण्यापेक्षा नियमबाह्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी साखळी उघड झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे. मात्र या तपासात साखळीच्या मुळाशी जाऊन फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी ही अपेक्षा केली जात आहे. जेणेकरून भविष्यात या गैरव्यवहारांवर अंकुश लागेल व सरकारची फसवणूक टळण्यासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराची साखळीही तुटेल.

जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल गांगुर्डे यांना नाशिक तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या बदलीसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खासगी व शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर व लिपीकाशी संगनमत करून बनावट दाखले तयार केल्याचा ठपका गांगुर्डे यांच्यासह इतरांवर आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्यावर कारवाई होऊ शकते याची भनक लागताच संशयित अधिकारी व कर्मचारी दिसेनासे झाले. आपल्याला काहीच होणार नाही अशा अविर्भावात वावरणाऱ्या या साखळीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका बसला. कर्मचारी जेलमध्ये जाताच अधिकाऱ्यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास व निकाल काय लागेल याबाबत अद्याप कोणी ठाम सांगू शकत नसले तरी संशयितांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णालयातच होत आहे. कारण शासनाने सोपवलेली जबाबदारी सोडून त्यांना मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून दिवसरात्र वैद्यकीय बिले व प्रमाणपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची माया जमवण्यावरच या साखळीचा जोर असल्याची चर्चा रुग्णालयात आहे. लिफ्टमन असलेले गांगुर्डे लिफ्टमध्ये कमी आणि वाहनतळ व अधिकाऱ्यांच्या कक्षातच जास्त दिसत होते. ‘फक्त पैसे द्या आणि नाव सांगा, काम होऊन जाईल’ अशी ओळख या साखळीने तयार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार किती वर्षांपासून व कोणत्याही भितीशिवाय सुरु असल्याचा अंदाज बांधता येतो. एकाच ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे ठाण मांडून ठेवल्याने हे प्रकार सर्रास होत असल्याचेही समोर येत आहे. याआधीही जिल्हा रुग्णालयात अनेक गैरव्यवहार उघड झाले आहेत. एक खासगी रुग्णालयातील महत्वाच्या रेकॉर्ड रुमचा ताबा अनेक वर्षांपासून स्वत:कडे ठेवून असल्याचे समोर आले होते. या व्यक्तीने रुग्णालयात स्वत:चा स्वतंत्र दबदबा निर्माण करून आपण शासकीय कर्मचारी आहोत असे वातावरण तयार केले होते. त्याचा गैरफायदा घेत त्याने वैद्यकीय बिलांसाठी लागणाऱ्या रेकॉर्ड रुमचा ताबा ठेवून इतर अधिकारी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून आर्थिक कमाई केल्याचा आरोप झाला. अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी मर्जीतील कर्मचाऱ्यांना रुग्णालयातील आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या टेबलची जबाबदारी सोपवत असल्याचेही आढळून आले आहे. रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेले किंवा कंत्राट संपलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचा रुग्णालयातील वावरही चर्चेचा विषय असतो. या आर्थिक गैरव्यवहारांमुळे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर कर्मचाऱ्यांवर निलंबन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती किंवा वेतनवाढ रोखण्याच्या कारवाई केल्या आहेत. तरीदेखील शासकीय पगारासाेबत इतर गैरमार्गांनी मिळणाऱ्या पैशांची हाव आरोग्य व्यवस्थेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुटत नसल्याचे दिसते.

हेही वाचा:

The post रविवार विशेष: सिव्हीलमधील भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचे आव्हान appeared first on पुढारी.