राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तारूढ शिवसेना-भाजप बरोबर आहे, तर दुसरा विरोधकांसोबत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटीमुळे राष्ट्रवादीत खरोखर फूट पडली आहे की हे संमतीचे राजकारण सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप नेते तथा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मात्र हा संभ्रम लवकरच दूर होईल, असा दावा केला आहे.

स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच भूमिकेविषयी निर्माण झालेल्या संभ्रमाविषयी महाजन यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणात काय होईल, ते सांगता येत नाही. अजित पवार आणि छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे-पाटील हे भाजपबरोबर येतील, असे वाटत होते का, असा प्रश्न करत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी त्यांनी सूचक संकेत दिले. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीविषयी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून, ते संबंधितांना निर्देश देतील, असे महाजन म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे संपूर्ण देश तिरंगामय बनल्याचे सांगत काँग्रेसमधील परिवार वादावर महाजन यांनी टीका केली. देशापेक्षा परिवार कसा वाचेल, यासाठीच विरोधकांचे प्रयत्न सुरू असून, ज्यांना घर वाचवायचे आहे ते धडपड करत आहेत, असे ते म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर तुमची सत्ता असताना मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर पडले नाहीत. त्यावेळी ते घराबाहेर पडले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी टीकाही केली.

पालकमंत्री पदाबाबत वाद नाही

ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपदाच्या बदलाबाबत चर्चा सुरू असली तरी पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. ही केवळ तात्पुरती व्यवस्था असल्याचे नमूद करत छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे, असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही, असे महाजन म्हणाले. सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणते खाते द्यायचे हे नेते ठरवतील. सर्व संमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नाहीत, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post राष्ट्रवादीत फूट की एकसंध लवकरच कळेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.