विविधरंगी फुलांच्या दुनियेत रमले नाशिककर; आज समारोप

पुष्पोत्सव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव 2023’ला दुसर्‍या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे एक लाख नाशिककरांनी दोन दिवसांत भेट दिली.

वीकएन्ड असल्याने शनिवारी (दि.25) सकाळपासूनच नाशिककरांनी गर्दी केली होती. संध्याकाळी ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. प्रसाद दुसाने यांच्या ‘स्वर तेज’ ग्रुपने कार्यक्रम सादर केला. यावेळी अभिनेता किरण भालेराव उपस्थित होता. ‘पुष्पोत्सव’मध्ये विविध गटांत सुमारे 750 प्रवेशिका आहेत. 31 नर्सरी व 11 फूड स्टॉल्स आहेत. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग आहे.

मनपा मुख्यालयातील तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी आहे. गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस अशा शोभिवंत कुंड्याही ठेवल्या आहेत. जमिनीवरील आणि हँगिंग असे दोन्ही प्रकार आहेत. मनपाच्या सहा विभागीय कार्यालयांतील उद्यान विभागाने नावीन्यपूर्ण संकल्पनेवर सहा उद्यान प्रतिकृती साकारल्या आहेत. नागरिक इथेही आवर्जून भेट देत आहेत.

आज समारोप
रविवारी (दि.26) सायंकाळी 6.30 वाजता पुष्पोत्सवाचा समारोप होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफिजचे वितरण हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सव 26 मार्चपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांसाठी खुला असणार आहे.

हेही वाचा:

The post विविधरंगी फुलांच्या दुनियेत रमले नाशिककर; आज समारोप appeared first on पुढारी.