शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त उपक्रम; ‘जाणता राजा’ महानाट्यातून नाशिककर अनुभवणार शिवगाथा

सिडको; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून नाशिककरांना तीन दिवस विनामूल्य शिवगाथा अनुभवण्याची संधी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2 जून 2023 ते 6 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित/दिग्दर्शित महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान, पुणे निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा महानाट्याचे तीन दिवस आयोजन सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे करण्यात आले आहे.

या महानाट्याचा पहिल्या दिवसाचा उद्घाटनाचा प्रयोग आज नाशिक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे सादर करण्यात आला. या महानाट्याचा प्रारंभ अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, नीती, चरित्र, विचार व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली अलौकिक वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाणता राजा या महानाट्याचे 2 ते 4 मार्च 2024 या तीन दिवसांच्या कालावधीत नाशिक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याचा आज एक हजार 186 वा प्रयोग सादर करण्यात आला. या महानाट्यात अफजल खानाचा वध, आग्र्यावरून सुटका, सुरतेवर छापा अशा अनेक रोमहर्षक प्रसंगासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही जिवंतपणे साकारला आहेत. जाणता राजा या महानाट्यात साधारण 200 कलाकारांचा समावेश आहे. तसेच साधारण 35 ते 40 स्थानिक कलाकार सहभागी झाले असून घोडे, उंट या प्राण्यांचा देखील प्रत्यक्ष वापर या महानाट्यात करण्यात आला आहे.

The post शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त उपक्रम; 'जाणता राजा' महानाट्यातून नाशिककर अनुभवणार शिवगाथा appeared first on पुढारी.