सजग नागरिका… तुला सलाम!

नाशिक : संकेत शुक्ला

सीमेवरचा सैनिक आणि देशातला नागरिक जागरूक असला की देशाची सुरक्षा अबाधित राहाते, असे म्हणतात. या दोन्ही घटकांवर देशाची अंतर्गत आणि बाह्य सूरक्षा अवलंबून असते. सैन्याचे योगदान वादातीत आहेच, मात्र आता देशातील नागरिकही जागरूक होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. नाशिकमध्ये काही दिवसांपुर्वी आलेले उंट आणि आता काही मुलांची होत असलेली कथित तस्करी याबाबत नागरिकांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्यातील जबाबदार नागरिकाने संबंधित खात्याला दिलेल्या माहितीमुळेच संभाव्य दुर्घटना टळली. जागोजागी होणाऱ्या बेकायदेशिर कृत्यांबाबत माहिती देण्याची आणि त्यावर त्वरीत कारवाई करण्याची जागरुकता ज्यावेळी संबंधितांकडून दाखवली जाईल त्यावेळी खऱ्या अर्थाने कायद्याचे राज्य निर्माण होण्यास मदत होईल.

आजकाल मोबाईल हे मोठे शस्त्र प्रत्येकाच्या हातात आले आहे. त्याचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या मनसिकतेवर अवलंबून असते. एखादा अपघात होत असताना त्याची शूटींग करून त्या अपघाताचा व्हिडिओ टाकणाऱ्यांची कमी नाही. मात्र त्याच मोबार्सलचा वापर करून कायदा तोडणाऱ्यांची शूटिंग घेणारेही आता तयार होवू लागले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे चांगले संकेत आहेत. नागरिकांच्या याच सजगतेमुळे गेल्या महिन्यात दक्षिणेत जाणाऱ्या उंटांच्या काबिल्याचा पु्न्हा घराकडे प्रवास होवू शकला. आताही दोनच दिवसांपुर्वी संशयास्पदरित्या होत असलेली मुलांची वाहतूक हेरून त्याबद्दल त्वरीत रेल्वे पोलिसांकडे ट्विट करून या मुलांच्या सुटकेसाठी एका सजग नागरिकाने केलेले प्रयत्न कामी आले आणि सर्वच मुलांची सुटका करण्यात आली. या मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर त्यांची वाहतूक करणाऱ्यांची पोलिस चौकशी सुरू आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईलच; मात्र ते बाहेर येण्याआधीच असा काही प्रकार पून्हा घडला तर त्याबाबत यंत्रराच जागरूक झालेली असेल. सोशल माध्यमांचा वापर चांगल्या कृत्यासाठी होवू शकतो हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. त्याचीच ही दोन उदाहरणे आहेत. ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती कमी झाल्यास कायद्याचा धाक निर्माण होवू शकेल. त्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराची जशी गरज आहे तशीच पोलिसांच्या कार्यतत्परतेचीही. एखाद्या नागरिकाने संभाव्य गुन्हेगारी घटनेची माहिती दिल्यास त्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, माहिती देत आपण चूक केली असे त्याला वाटायला नको. त्याची खबरदारी घेतली गेली तर समाजात नक्कीच कायद्याचे संरक्षक तयार होतील यात शंका नाही.

The post सजग नागरिका... तुला सलाम! appeared first on पुढारी.