सत्य’जित’वर काँग्रेसची दावेदारी; आज भूमिका मांडणार

Satyajeet Tambe

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी भरघोस मतांनी विजय संपादित करत मतदारसंघावर पुन्हा एकदा तांबे कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध केले. विजयानंतर तांबे पिता-पुत्र काँग्रेसमध्ये राहतील, असे सांगत काँग्रेसकडून तांबे कुटुंंबावर दावेदारी सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीआधी व नंतर काँग्रेसची दुट्टपी भूमिका उघड झाली आहे. (Satyajeet Tambe)

अवघ्या राज्यात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांनी पहिल्या पसंतीची विक्रमी 68 हजार 999 मते घेतली. त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. तांबे यांनी तब्बल 29 हजार 465 मतांनी पाटील यांचा पराभव करत मतदारसंघावरील तांबे कुटुंबाची पकड अधिक घट केली. या विजयासोबत काँग्रेसची भाषा मवाळ झाली आहे. तांबे पिता-पुत्रांना आपल्याकडे खेचण्यासाठी पक्षांतर्गत प्रयत्न सुरू झाले आहेत. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तांबेंबद्दल पक्षाचे हायकमांड निर्णय घेतील, असे सांगत अधिकचे भाष्य करणे टाळले. काँग्रेस नेत्यांची बदललेली भाषा बघता ‘अपयशाला कोणी वाली नसतो; पण यशाचे सारेच धनी बनतात’ या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय येतो.(Satyajeet Tambe)

वास्तविक निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर विद्यमान आमदार सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षातून टीकेची झोड उठली. तत्काळ त्यांचे निलंबन करताना पक्षांतर्गत चौकशीचा ससेमिरा मागे लावला. त्यानंतर कॉग्रेसने सत्यजित तांबेंचे निलंबन करून पक्षात बंडखोरीला स्थान नाही, अशा शब्दांत कडक संदेश देण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता गेल्या 15 दिवसांत तांबे पिता-पुत्रांवर आरोप करण्याची एकही संधी काँग्रेसच्या नेत्यांनी सोडली नाही. परंतु, विजयानंतर तांबेंना गळाला लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण गेल्या पंधरवाड्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने नूतन आ. तांबे काँग्रेसशी हातमिळवणी करणार की त्यांना पंजा दाखविणार हे पाहावे लागले.

आज भूमिका मांडणार

निर्वाचित आमदार सत्यजित तांबे हे शनिवारी (दि.4) त्यांची पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, सत्यजित यांनी अपक्षच राहावे, अशी डॉ. सुधीर तांबे यांची इच्छा आहे. त्यामुळे सत्यजित तांबे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

अधिक वाचा :

The post सत्य’जित’वर काँग्रेसची दावेदारी; आज भूमिका मांडणार appeared first on पुढारी.