सप्तशृंगी गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असून, जिल्हाभरात गुटखा तस्कर व विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. मात्र, गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सप्तशृंगगडावर चांदणी चौक, दत्तमंदिर चौक, हनुमान मंदिर परिसर, मंमादेवी परिसर, शिवालय तलाव, ट्रस्ट परिसर, नागेश्वरी चौक, जनरल स्टोअर्स या ठिकाणी छोटे-मोठे टपरीधारक व दुकानदार असून, काही ठराविक टपरी व दुकानांतून सर्रासपणे अवैध गुटख्याची विक्री होते. गुटखा विक्रीचा कोणाला संशय येऊ नये म्हणून कागदाच्या पुडीत बांधून गुटखा शब्द न संबोधता कोडवर्डद्वारे गुटखा विक्री सुरू आहे. यात दुकानदार व टपरीवाल्यांकडून ग्राहकाला वीस रुपयांची की पन्नास रुपयांची पाहिजे, अशी विचारणा केली जाते. म्हणजे छोटी गुटख्याची पुडी पाहिजे असेल तर वीस रुपयांना आणि मोठी पुडी पाहिजे असेल तर पन्नास रुपयांना, अशी शक्कल लढवत गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे कोणालाच गुटखा विक्रीचा संशय येत नाही.

गुटख्याची पुडी खिशात घालून लांब जाऊन खा व गुटख्याच्या पुडीचा कागद हा जाळून टाका किंवा लांब फेकून देण्याचा सल्लाही गुटखा विक्रेते ग्राहकांना देत आहेत. पहाटे पाच वाजता ठराविक टपरी उघडून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू असल्याने गुटखा विक्रेत्यांनी भाव वाढवल्याने दुकानदारही चढ्या दराने गुटखा विक्री करीत आहेत. सप्तशृंगगडावर साध्या वेशातील पोलीस अधूनमधून चौकशीसाठी येतात. परंतु त्यांच्या डोळ्यांतही धूळफेक करत तूरडाळीच्या नावाखाली सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

सप्तशृंगगड हे पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी भाविकभक्तांची वर्दळ चालू असते तसेच चोहोबाजूंनी जंगल असल्याने या ठिकठिकाणी गावालगत गुपचुप सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. यामुळे याबाबत पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

The post सप्तशृंगी गडावर कोडवर्डमध्ये गुटखा विक्री appeared first on पुढारी.