सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार

शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सामजिक ऐक्याला धक्का बसेल अशा प्रकारचे लिखाण शैक्षणिक अभ्यासक्रमात आले, तर ते योग्य नाही. सावरकरांचे धडे वगळण्याबाबतचे आश्वासन काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीपूर्वी जाहिरनाम्यात दिले होते. तेथील जनतेने त्यांना निवडून दिले आहे. याचा अर्थ त्या जाहिरनाम्याला लोकांची मान्यता आहे. ज्याला मान्यता आहे, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे त्या सरकारचे कर्तव्य असते आणि तेच काम कर्नाटकात काँग्रेसने केले, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि. 16) अमळनेरमध्ये झाले. त्यातील पहिले सत्र झाल्यावर आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले, देशामध्ये विविध राज्यांचे चित्र बदलत आहे. गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

खोक्यांच्या कार्यक्रमाद्वारे सत्ता आणली

केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत भाजप आहे. मध्य प्रदेशात आहे. पण मध्य प्रदेशात भाजपचे राज्य नव्हते. तिथे कमलनाथ यांचे सरकार होते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. गोव्यात काँग्रेस होती. आमदार फोडले. खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, असेही त्यांनी सांगितले.

देशपातळीवरही परिवर्तन होणार…

बहुसंख्य राज्यांमध्ये लोकांनी भाजपला नाकारले आहे. त्यामुळे आता लोक देशपातळीवरही वेगळा विचार करतील असे वाटते. असे असेल, तर एकत्र बसून सर्वांनी विचार केला पाहिजे. लोकांच्या इच्छांची पूर्तता केली पाहिजे. देशात शेतीमालास भाव नाही, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. या सर्व गोष्टी बदलायच्या असतील, तर परिवर्तन हाच त्यावर पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले.

वंचित आघाडी ही भाजपची टीम बी…

काही वेळेला राजकारणात स्वत: लढायचे नसते. दुसऱ्याच्या पायात पाय घालण्यासाठी एक-दोन टीम तयार करायच्या असतात. त्याला साधारणत: ही राजकारणाची बी टीम म्हणतात. मागच्या निवडणुकीत आम्हाला नुकसान सहन करावे लागले होते. वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला ते नुकसान झाले होते, अशा शब्दांत शरद पवारांनी वंचित आघाडीवर टीका केली.

हेही वाचा :

The post सावरकरांचा धडा वगळण्यास लोकांची मान्यता : शरद पवार appeared first on पुढारी.