स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची?

spam call www.pudhari.news

नाशिक : दीपका वाघ

डिजिइन्फो:

तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करत असतात, नेमका त्याच वेळी अचानक फोन आल्यावर धावपळ करत तुम्ही तो फोन रिसिव्ह करतात आणि तो स्पॅम कॉल निघतो. असा अनुभव अनेकांना अनेकवेळा आला असेलच. दिवसभर असे अनेक स्पॅम कॉल्स, मेसेजेस मोबाइलवर येतच असतात. त्यामुळे चिडचिड तर होतेच पण एखादा महत्त्वाचा कॉल आला, तरी स्पॅम कॉल समजून तो रिसिव्ह केला जात नाही. स्मार्ट यूझर्सला असे स्पॅम कॉल्स कसे टाळावे हे माहिती असेल पण मोबाइलचा जेमतेम वापर करणार्‍यांना माहिती नसेल, तर अशा स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची कटकट कशी बंद करायची ते बघू या…

आपला मोबाइल नंबर दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगळुरू, गाझियाबाद या ठिकाणापर्यंत कसा पोहोचत असेल? तर आपणच आपला मोबाइल नंबर नवीन प डाउनलोड करताना व्हेरिफिकेशन करण्यासाठी देतो तसेच एखाद्या कार्यक्रमाला, मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर मोबाइल नंबर द्यावा लागतो. अशाप्रकारे आपणच आपले मोबाइल नंबर इतरांना देत असतो. कंपन्या त्या मोबाइल नंबरचा डाटा विकून बक्कळ पैसेही कमवत असतात. त्यामुळे कुठेही आपला मोबाइल नंबर देताना काळजी घ्यावी. कधी बँकेशी मिळतेजुळते असणारे मेसेजेस येतात, तर कधी मेसेजमध्ये फेक लिंक येत असते. मोबाइल नंबरसुद्धा 98, 95, 99, 92, 70, 72 अंकापासून सुरुवात होणार्‍या नंबरवरून येतात. अशा नंबरवरून कॉल आले की, आपल्याला वाटते ओळखीचा असेल, पण अशा नंबरवरूनही फेक कॉल्स येतात.

यावर उपाय काय?
मोबाइलच्या एसएमएसमध्ये जा. कॅपिटल लेटरमध्ये FULLY BLOCK टाइप करून 1909 नंबर पाठवा. तसेच एसएमएसच्या सेटिंगमध्ये ‘स्पॅम’ नावाचा पर्याय असतो. त्यामध्ये स्पॅम मेसेजेस (ब्लॉक केलेले मेसेज) आलेले असतात. समजा चुकून एखादा नंबर ब्लॉक झाला, तरी तो नंबर नंतर अनब्लॉक करता येतो. त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. हा एक सोपा आणि अधिकृत मार्ग आहे. स्मार्ट फोन वापरण्याच्या जमान्यात स्पॅमर्सही स्मार्ट झाले आहेत. ते शक्कल लढवून वेगवेगळ्या नंबरवरून तुम्हाला कॉल्स / मेसेजेस करून त्रास देऊ शकतात. त्यासाठी काय करायचे, मोबाइल कॉल लिस्ट मध्ये जा. तिथे तीन डॉटस दिसतील त्या सेटिंगमध्ये जा. (प्रत्येकाचे मोबाइल सेटिंग आणि स्पेलिंग वेगवेगळे असू शकते) ब्लॉक नंबरवर क्लिक करा. ब्लॉक कॉल्स फ्रॉम Unidentified Callers हा पर्याय सुरू करायचा. (इथे ब्लॉक / अनब्लॉक करण्याचा पर्याय असतो) त्यामुळे तुम्हाला स्पॅम कॉल्स येणार नाही. बँकेचे कॉल्स, मेसेजेस मात्र ब्लॉक होत नाहीत. कॉलर आयडी आणि स्पॅम पर्याय सुरू नसेल, तर तोसुद्धा सुरू करा. कॉल लिस्टमधील सेटिंगवर हा पर्याय दिसतो. तो चालू केल्यामुळे स्पॅम कॉल असेल, तर तो लाल रंगात दाखवतो आणि छोटीशी रिंग वाजून लगेच बंद किंवा कट होतो. शिवाय कॉल येऊन गेल्यानंतर तीन डॉटवर क्लिक केल्यावर ब्लॉक पर्याय येतो त्यावरून तो कॉल ब्लॉक करता येतोे. तुम्ही ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरता, त्या कंपनीच्या पमधील सेटिंगमध्ये डीएनडी (डू नॉट डिस्टर्ब) पर्याय असतो तो सुरू करा. जिओचे (माय जिओ), एयरटेल (माय एयरटेल), व्होडाफोन-आयडिया (माय व्हीआय) अ‍ॅप्लिकेशन आहेत.

The post स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची? appeared first on पुढारी.