Diwali 2022 : जळगावात सुवर्णपेठेला यात्रेचे स्वरुप

जळगाव सुवर्णपेट,www.pudhari.news

जळगाव : दिवाळीनिमित्त सोन्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात फुलली आहे. कोरोना काळानंतर यंदा दिवाळी सर्वजण मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करत आहे. यातच दिवाळी सणानिमित्त महालक्ष्मी पूजनाला अनेक ग्राहक आपल्या घरात सोने खरेदी करत असतात. या स्पर्शभूमीवर धनत्रयोदशीपासून जळगावातील सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा भाव ५१ हजार ५०० रूपये तर चांदीचा भाव ५७,७०० रुपये आहे. यंदा मागणी वाढली असली तरीही गत वर्षीच्या तुलनेत सोन्याचे भाव कमीच आहेत.

साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. यासोबतच धनत्रयोदशीलादेखील सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तसेच चांदीच्याही भावात दोन हजार वाढ होऊन एक किलोचा भाव ५७,७०० रुपये प्रति किलोवर पोहचला.

सराफापेठा गजबजल्या…
सुवर्णनगरी जळगावात जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहक येतात. धनत्रयोदशीला राज्यभरातून ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. मात्र, जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम जळगावातही पाहायला मिळत आहे. दरम्यान आजच्या सोन्याच्या दरांबाबत बोलायचे तर आज हे दर ५१,५०० हजार रुपये इतके आहेत. हाच दर गेल्या वर्षी ५३,५०० च्या जवळपास होता. त्यातुलनेत यंदाच्या दिवाळीत सोने जवळपास २ हजार रुपयांनी घसरले आहे. तर चांदीचा दर ५७,७०० वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी सोने खरेदीसाठी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली आहे. जळगावातील सराफा पेठेत नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याने सराफा पेठेला जत्रेचे स्वरुप आले आहे.

हेही वाचा :

The post Diwali 2022 : जळगावात सुवर्णपेठेला यात्रेचे स्वरुप appeared first on पुढारी.