HSC Result 2023 : नाशिक विभागात मुलींचाच डंका

बारावीचा निकाल,www.pudhari.news

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळ ९१.६६ टक्के गुणांसह राज्यात सातवा क्रमांक राहिला. जळगाव जिल्हाला ९३.२६ टक्क्यांंसह विभागात अव्वल ठरला. तर नाशिक जिल्हा ९०.१३ टक्क्यांसह विभागात सर्वांत शेवटी फेकला गेला. यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

नाशिक विभागातील एक हजार ७० कनिष्ठ महाविद्यालयातून १ लाख ५९ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १ लाख ५९ हजार ००२ विद्यार्थ्यांनी २५६ केंद्रांवर प्रत्यक्षात लेखी परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल १ लाख ४५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर १३ हजार २५३ विद्यार्थी नापास झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ७९ हजार ७१९ मुलांचा, तर ६६ हजार ३० मुलींचा समावेश आहे. संपूर्ण विभागात मुलींचा निकाल ९४.४६ टक्के, तर मुलांचा ८९.४६ टक्के निकाल लागला आहे.

नाशिक विभागात जळगाव जिल्ह्याचा सर्वाधिक ९३.२६ टक्के इतका, तर नाशिक जिल्ह्याचा सर्वांत कमी ९०.१३ टक्के इतका निकाल लागला आहे. धुळे जिल्ह्यात ९२.२९ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात ९३.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विभागाचा निकाल २.६९ टक्क्यांनी घसरला आहे.

विभागातील १४ हजार ४१६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ५५ हजार ८१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६१ हजार ५७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १३ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.

दरम्यान, संपूर्ण परीक्षा कालावधीत ६६ गैरमार्ग प्रकरणे घडली होती. विभागीय चौकशीनंतर संबंधित विद्यार्थ्यांचे संपदणूक रद्द करण्यात आल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

जिल्हानिहाय निकाल

नाशिक- ९०.१३ %

धुळे- ९२.२९ %

जळगाव- ९३.२६ %

नंदुरबार- ९३.०३ %

हेही वाचा :

The post HSC Result 2023 : नाशिक विभागात मुलींचाच डंका appeared first on पुढारी.