Nashik : अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : डॉ. भारती पवार यांचा इशारा

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

औषधे खरेदीतील दिरंगाईमुळे मध्यंतरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रुग्णांना औषधे न मिळाल्याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेत जिल्हा नियोजन समितीकडे २ कोटींचा निधी उपलब्ध असूनही औषधे वितरणातील गलथान कारभाराच्या चाैकशीचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही डॉ. पवार यांनी मंगळवारी (दि.१६) दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये डॉ. पवार यांनी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठक घेतली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा डॉ. पवार यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. मध्यंतरीच्या काळात तेथून रूग्णांना औषधही मिळणे दुरापास्त झाले होते. दिशा बैठकीत याच मुद्यावर पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. डाॅ. पवार यांनी औषधांअभावी रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या हालअपेष्टांबाबतचा मुद्दा मांडला. त्यावर निधी नसल्याने औषधे खरेदी केली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या दाव्यावर हरकत घेत तब्बल २ कोटींचा निधी जिल्हा नियोजनकडे उपलब्ध होता. तसेच आरोग्य विभागाकडून वेळेत प्रस्ताव सादर न झाल्याबाबत त्यांनी डॉ. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर चिडलेल्या पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

पुरेसा निधी उपलब्ध असूनही औषधे खरेदीत दिरंगाई का झाली याचा जाब त्यांनी विचारला. पण अधिकाऱ्यांना त्याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. अखेर सदर प्रकार गंभीर असून त्याची सखाेल चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश डॉ. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी केंद्र पुरस्कृत ३८ योजनांचा डॉ. पवार यांनी आढावा घेतला. बैठकील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१६ लाख कार्डाचे वाटप

केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात साधारण 16 लाख 12 हजार174 लाभार्थी असून त्यापैकी 6 लाख 876 लाभार्थ्यांना आयुष्यमान आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील काम प्रगतीपथावर असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. जिल्ह्यात २८ हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर्स मंजूर झाले असून त्यापैकी 13 केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : डॉ. भारती पवार यांचा इशारा appeared first on पुढारी.