Nashik : घोटीच्या राइस मिलमध्ये पुण्यातील रेशनचा तांदूळ जप्त

रेशनचा तांदूळ जप्त

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या घोटी येथील सर्वांत मोठ्या व्यापार्‍याच्या राइस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून १२ लाख रुपये किमतीचा चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो व ४ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ असा एकूण १६ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली असून, घोटीतील इतर राइस मिलकडेही संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. शहरातील सर्वांत मोठा व्यापारी मे. भाकचंद केशरमल पिचा यांच्या राइस मिलमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातून या मिलवर येणार असल्याची खबर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकला असता टेम्पोत लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ आढळून आला.

संबंधित मिल मालक तुषार नवसुखलाल पिचा, टेम्पोचालक विलास फकीरा चौधरी (२९, रा. खंबाळे, ता. इगतपुरी), विक्रेता चेतन ट्रेडिंग कंपनीचे मालक तथा ब्रोकर महेंद्र सिंघवी (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…तर आणखी प्रकार उघडकीस येतील

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे घोटीमध्ये बाहेरच्या तांदळाची विक्री होत असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. पोलिस व जिल्हा प्रशासनाने घोटी व इगतपुरीतील व्यापाऱ्यांकडे धडक मोहीम राबविल्यास असे आणखी काही प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : घोटीच्या राइस मिलमध्ये पुण्यातील रेशनचा तांदूळ जप्त appeared first on पुढारी.