
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात अडीच वर्षाच्या बालकाला थेट विहीरीत फेकून देत त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे घडला आहे. पत्नीच्या फिर्यादीवरुन पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिंडोरी पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वर्षा राजेन्द्र अपसुंदे (28) व राजेन्द्र छबु अपसुंदे (43) रा. कादवा म्हाळुंगी हे दोघे पती पत्नी आहेत. राजेन्द्र हा पत्नी वर्षा हिच्या चारित्र्यावर संशय घेत, हा मुलगा माझा नाही असे बोलत तीचा मानसिक छळ करत होता. त्यातूनच त्याने रागाच्या भरात मुलगा घनशाम राजेन्द्र अपसुंदे (वय अडीच वर्ष) यास गावातीलच निवृत्ती देवराम निकम यांच्या विहीरीत टाकून जीवे मारले असल्याची तक्रार वर्षा यांनी दिली आहे.
दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तात्काळ याची दखल घेतली व संशयित राजेन्द्र आपसुंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट या पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून बालकाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
- राज ठाकरे नाशिकमध्ये, आज घेणार पक्षांतर्गत आढावा
- विरोधकांना काही काम धंदा नाही, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण करताय : उदय सामंत
- त्र्यंबकेश्वरमध्ये एसआयटी पथकाकडून चौकशी, सविस्तर अहवाल सादर करणार
The post Nashik : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, अडीच वर्षाच्या मुलाला फेकले विहीरीत appeared first on पुढारी.