तापी नदी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गावित

नंदुरबार, पुढारी वृत्‍तसेवा : तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वळवून परिसरातील शेती १०० टक्के सिंचनाखाली येण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते नंदुबार तालुक्यातील खोंडामळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ९ गावांच्या पणीपुरवठा योजनेच्या भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक व्यक्तिचे आपापल्या क्षेत्रात एक ध्येय असते, त्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्नांची शिकस्त करत असते. त्याप्रमाणे तापी नदीचे पाणी परिसरातील नंदुरबार व शहादा तालुक्यातील शेतांमध्ये पोहोचवून १०० टक्के शेती सिंचनाखाली आणायचे आमचे ध्येय असून ते पूर्णत्वास येण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील आहोत.

ते पुढे म्हणाले, वावर-शिवार, घर आणि घरातल्या प्रत्येकासाठी पाणी देण्यासाठी आपण कटीबद्ध असून जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाण्याचे नियोजन करून येणाऱ्या ३० वर्षांना पुरेल एवढे पेयजल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल १०० टक्के शासन भरणार असल्याने विद्युतपुरवठ्या अभावी योजना थांबणार नाही, अशी ही शाश्वत स्वरूपाची जलयोजना असल्याचेही यावेळी यावेळी सांगून लवकरच पक्क्या रस्त्यांच्या निर्मितीतून,गटारींच्या बांधकामातून गावातील वाड्या-वस्त्या चकाकणार असल्याचीही ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.

आरोग्य सेवांचे बळकटीकरण 

प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जाणार असून मोठ्या गावांमध्ये आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारून आवश्यकतेनुसार तेथे सेवा वाढविल्या जातील. आवश्यक तेथे अंगणवाड्या उभारून शाळेच्या खोल्या, विद्युतीकरण करणार असल्याचेही डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

शाश्वत स्वरूपाची जलयोजना : खासदार डॉ. हिना गावित 

खोंडामळी व पंचक्रोशीतील गावांची लोकसंख्या ही १६ हजार १४४ इतकी असून येणाऱ्या ३० वर्षात ही लोकसंख्या २३ हजार इतकी असेल, असे गृहित धरून जलजीवन मिशनच्या माध्यमातून सतत पाणीपुरवठ्याची शाश्वत स्वरूपाची योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीला गृहित धरून साकारणाऱ्या या योजनेत सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन होण्यासाठी गटारींच्या निर्मितीचीही योजना केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गावागावत राबवली जाईल. त्यासाठी ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावांना थेट ग्रामपंचायतींना निधी वितरित केला जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील ५ हजार लोकसंख्येच्या गावांचा आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे मंजूरीला पाठवला जाईल.

या गावांच्या पाणी पुरवठा योजनांचे झाले भुमीपूजन 

यावेळी खोंडामळी, धामडोद, बामडोद, शिंदगव्हाण, विखरण, जुनमोहिदा, भालेर, भागसरी, कलमाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे भुमीपूजन करण्यात आले.

हेही वाचा  

The post तापी नदी परिसरातील १०० टक्के शेती सिंचनाखाली यावी यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गावित appeared first on पुढारी.