Nashik : औषधे खरेदीचे कागदी घोडे, निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी रखडली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून दोन ते तीन कोटींची औषध खरेदी केली जाणार असून, त्याकरिता निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अशातही आरोग्य विभागाकडून कागदी घोडे नाचविले जात असल्याने, औषध खरेदी रखडली असल्याची चर्चा आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून औषध कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार औषधांचा साठा मागविला जात असतो. दरम्यान, आरोग्य विभागाच्या ढिसाळ अन् कासवगती कारभारामुळे अत्यावश्यक सेवेत असलेली औषधे अद्यापही खरेदी केले नसल्याची बाब समोर येत आहे.

महापालिकेचा आरोग्य विभाग सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असतो. नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये सुविधांची वानवा असल्याने, रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. मात्र, अशातही आरोग्य विभागाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. याठिकाणी असलेली सोनोग्राफी, एक्स-रे मशीन बंद अवस्थेत आहेत. बिटको रुग्णालयातील आरोग्य विभागाचा विषय जटील होत असताना, दुसरीकडे मात्र, स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचे समोर येत आहे. आरोग्य विभागाच्या या सैर कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना औषध खरेदीचा मुद्दा समोर आला आहे.

औषध खरेदीसाठी राबविण्यात आलेली निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून याबाबत वेळीच हालचाली केल्या नसल्याने स्थायी सभेमध्ये त्यास मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, महापालिकेचे नाशिकरोड, झाकिर हुसेन, पंचवटी, सिडको या भागांत मोठी रुग्णालये असून, या ठिकाणी औषधांची प्रचंड आवश्यकता भासते. परंतु खरेदीप्रक्रिया रखडल्याने, रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्थायीच्या निर्णयाचे आश्चर्य

महापालिकेच्या विविध विभागांमधील कोट्यवधींच्या कामांसाठी तत्काळ मंजुरी दिली जात असल्याचे आजवरचे चित्र आहे. मात्र, आरोग्याशी निगडीत असलेल्या औषध खरेदीला मात्र, स्थायी सभेत मंजुरी मिळाली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

औषध खरेदीला कोणताही उशीर झाला नसून, निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायीची मंजुरी मिळताच आवश्यकतेनुसार औषध खरेदी केली जाईल.

– बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी

हेही वाचा : 

The post Nashik : औषधे खरेदीचे कागदी घोडे, निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही खरेदी रखडली appeared first on पुढारी.