Nashik : मुंगसरे ठरले राज्यातील पहिले ‘आयएसओ’ उपकेंद्र

मुंगसरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या नाशिक परिमंडळातील मुंगसरे उपकेंद्र हे राज्यातील पहिले आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळविणारे केंद्र ठरले.

नाशिक परिमंडळातील गंगापूर उपविभागा अंतर्गत असणाऱ्या ३३/११ केव्ही मुंगसरा केंद्राला आयएसओचा दर्जा प्राप्त झाला. महावितरण अधिकाऱ्यांच्या हस्ते उपकेंद्राच्या आवारात शुक्रवारी (दि. ९) आयएसओ मानांकन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नाशिक शहर विभाग-२ चे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आयएसओ मानांकनासाठी परिश्रम घेणारे यंत्रचालक दीपक कासव, राजू पठाण, विश्वास गांगुर्डे, रामदास मोरे, तंत्रज्ञ भरत पवार आदींचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कासव यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश लाभले. ही गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न करताना आणखी विद्युत सुरक्षिततेत आयएसओ मानांकन मिळवण्याचा मानस व्यक्त केला. गंगापूर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी प्रास्ताविक, राजू पठाण यांनी सूत्रसंचालन केले. मखमलाबादचे सहायक अभियंता अनिल बागूल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुंगसऱ्याचे सरपंच रामदास उगले, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद भोसले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुंगसरे विद्युत उपकेंद्राला राज्यात पाहिले आयएसओ मानांकन मिळण्यासाठी येथील यंत्रचालक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्याच प्रकारे महावितरणमधील सर्वांनी दैनंदिन कार्यात उत्कृष्टतेचा ध्यास आणि सातत्य राखल्यास कुठल्याही कार्यात यश निश्चित मिळेल.

-दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ.

हेही वाचा :

The post Nashik : मुंगसरे ठरले राज्यातील पहिले 'आयएसओ' उपकेंद्र appeared first on पुढारी.