Nashik : योगेश घोलप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?

योगेश घोलप, सरोज अहिरे,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शपथविधी सोहळ्यानंतर स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप हे आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

रविवारी (दि. २) राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडाळीमुळे येथील देवळाली विधानसभा मतदारसंघातील राजकारण काही प्रमाणात बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीकडून संभाव्य उमेदवार म्हणून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना पाहिले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्या बाजूने आपला कौल दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे. या बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप यांनीदेखील आपली राजकीय भूमिका बदलावी, अशी गळ त्यांच्या समर्थकांकडून घातली जात आहे. आपल्याला भविष्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकते, तसे झालेच तर माजी आमदार घोलप यांनीदेखील शरद पवार यांच्या पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जाते आहे.

राजश्री अहिरराव यांच्यासह बाशिंगवीर सज्ज –

देवळाली विधानसभा मतदारसंघातून राजश्री अहिरराव, लक्ष्मण मंडाले, प्रीतम आढाव, प्रेरणा दोंदे आदी इच्छुकांनीदेखील आपल्याला कोणत्या राजकीय पक्षात भवितव्य आहे याविषयी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. लक्ष्मण मंडाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागच्या वेळेला इच्छुक होते. मात्र ऐनवेळी सरोज अहिरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळवत उमेदवारी मिळवली होती. प्रीतम आढाव आणि प्रेरणा दोंदे यादेखील भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. सध्या बदललेल्या राजकीय घडामोडींमुळे देवळाली विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाला जागा सुटू शकते, याविषयी आजच्या घडीला सांगणे अवघड बनले आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच राजकीय अडचण झालेली दिसते.

बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून?

माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून ते निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते. ठाकरे गटाने बबनराव घोलप यांची उमेदवारीदेखील जवळपास निश्चित केली असल्याचे वरिष्ठांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : योगेश घोलप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार? appeared first on पुढारी.