Nashik : स्पेशल मालपुवा ठरतोय रमजानचे आकर्षण; आस्वादासाठी नाशिककरांची गर्दी

रमजान ईद,www.pudhari.news

जुने नाशिक : कादिर पठाण

रमजान महिन्यात बाजारात असे काही खास पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध असतात, जे वर्षभर शोधूनही मिळत नाही, त्यात एक म्हणजे मालपुवा. सध्या मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान पर्व चालू असून, जुने नाशिक परिसरात मिनारा मशीदजवळ सुप्रसिद्ध मिनारा स्पेशल मालपुवा अल्पदरात म्हणजेच अगदी परवडण्यायोग्य भावात खवय्यांच्या सेवेत उपलब्ध आहे. गोड पदार्थांवर विशेष प्रेम असणाऱ्यांनी या ठिकाणी मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट दिली पाहिजे.

रोजा सोडण्याआधी याठिकाणी मालपुवाची विक्री सुरू होत असे. परंतु इफ्तार झाल्यावर म्हणजेच रात्री ८ पासून येथील दुकानात गर्दी पाहायला मिळते. रोजदारांसोबत लहान मुले व महिलांनाही मालपुवाची पसंती असल्यामुळे त्याच ठिकाणी खाणाऱ्या पाठोपाठ घरी पार्सल घेणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते.

सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा बडी दर्गा येथे दर्शनासाठी जुने नाशिकमधून बहुतांश श्रद्धाळू मिनारा मशिदीच्या मार्गाने जातात. म्हणून फक्त रमजान महिन्यापर्यंत इथे थाटणारी मालपुवाच्या दुकानांवर मेजवानी चाखण्यासाठी लोकं येथे गर्दी करत असतात.

रमजानच्या काळात शहरात अन्य काही ठिकाणीही मालपुवा विकला जातो. परंतु आमच्या मिनारा मशीद भागातील स्पेशल मालपुवासाठी खवय्यांची सर्वांत जास्त पसंती असते. पूर्ण रमजान महिन्यात याठिकाणी मालपुवाची मागणी असते

– सिकंदर शेख, मालपुवा विक्रेता

अनेक स्वादात पर्याय

स्पेशल मालपुवामध्ये मैदा, साखर, अंडी, वेलदोडा, मलाई बर्फीसहित ड्रायफ्रूट आदी सामग्री असते. मालपुवासाठी तुपात तळलेली अंडी व मैद्याची रोटी तयार झाल्यावर ग्राहकांच्या आवडीनुसार मलई बर्फी टाकण्यात येते. यात साधी मलई बर्फी, चॉकलेट मलई बर्फी, मँगो मलई बर्फी, अंजीर मलई बर्फी असे पर्याय असतात.

हेही वाचा :

The post Nashik : स्पेशल मालपुवा ठरतोय रमजानचे आकर्षण; आस्वादासाठी नाशिककरांची गर्दी appeared first on पुढारी.