Nashik Crime : नांदुरनाका परिसरात बसचालकाला तिघांकडून मारहाण

नाशिक : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचालकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना नांदूरनाका परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती संग्राम फड (३५, रा. गणेशनगर, लासलगाव) हे त्यांच्या ताब्यातील बस (एमएच १४, बीटी ४५०६)मधून नांदूरनाका येथील थांब्यावर प्रवासी उतरवित होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी बस का थांबवली, असे विचारत फड यांना मारहाण केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

चार लाखांच्या आयफोनचा अपहार

नाशिक : कामगाराने चार लाखांच्या ॲपल आयफोनचा अपहार केल्याची घटना गंगापूर रोड परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश ज्ञानेश्वर पाटील (२९, रा. बोधलेनगर) यांनी इन्स्टा कार्ड सर्विसेस कंपनीमधून डिलिवरीसाठी संशयित बळीराम रावजी खोकले (रा. धामणगाव, ता. इगतपुरी) याच्याकडे ५ ॲपल आयफोन दिले होते. संशयित खोकले यांनी आयफोनचा परस्पर अपहार केल्याची तक्रार पाटील यांनी गंगापूर पोलिसांत दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातून दोन दुचाकी चोरी

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सुरेशराव देशमुख (४६, रा. आकांक्षा अपार्टमेंट, चव्हाणनगर, पंचवटी) यांची स्वमालकीची दुचाकी (एमएच १५, एफसी ७७१५) राहत्या इमारतीच्या वाहनतळावरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तर नरेंद्र आनंदा जाधव (३७, रा. कुंभारवाडा, जुने नाशिक) यांची दुचाकी (एमएच १५, एटी ९५३८) गोदाघाटावरील गौरीपटांगण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी लांबविली.

हेही वाचा :

The post Nashik Crime : नांदुरनाका परिसरात बसचालकाला तिघांकडून मारहाण appeared first on पुढारी.