नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात पंतगप्रेमींकडून नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे आढळून आले. नायलॉन मांजामुळे जिल्ह्यात दोघांना गंभीर दुखापती झाल्या. तसेच पक्ष्यांचा मृत्यू झाला तर काही पक्षी गंभीर जखमी झाले आहेत.
नायलॉन मांजावर व ज्या मांजावर काचेचे धारदार, टोकदार कोटिंग केलेले आहे, अशा मांजाची निर्मिती, विक्री खरेदी व वापर आदींवर प्रतिबंध आहेत. तरीदेखील या मांजाची विक्री होत आहे. मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी तडीपारीसह गुन्हे दाखल केले आहेत. मात्र मांजाचा वापर होत असल्याने त्याचा धोका पक्षी, नागरिकांना होत आहे. जिल्ह्यात सिन्नर आणि कळवण भागात दोन जणांचा गळा मांजामुळे कापला गेला.
सिन्नर तालुक्यात उत्तम विष्णू आव्हाड (४९, रा. वडझिरे, ता. सिन्नर) हे दुचाकीवरुन जात असताना त्यांचा मांजाने गळा कापला गेला. संगमनेर नाका परिसरात ही घटना घडली. उत्तम आव्हाड हे त्यांच्या पत्नीसह वावी वेसकडून संगमनेर नाक्याकडे जात होते. यावेळी पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा गळा कापला. तसेच अकडलेला मांजा बाजूला करताना त्यांचा उजव्या हातास देखील दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आव्हाड यांना नाशिक येथील खासगी उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत कळवण येथून येवल्यातील रेल्वेस्टेशन परिसरात पैठणी घेण्यासाठी आलेल्या नीरज सुमीत राठोड (३०, रा. कळवण) हादेखील मांजामुळे जखमी झाला. नीरजच्या गळ्याला आठ टाके पडले आहेत. त्याला उपचारासाठी तत्काळ येवला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंधरा पक्ष्यांनाही इजा
इको एको रेस्क्यु संस्थेच्या वन्यजीव उपचार केंद्रात ९ ते १५ जानेवारी दरम्यान, १५ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. या पक्ष्यांना मांजामुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरात 21 कबुतरांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. १५) मांजामुळे २ घार व एक शराटी पक्षी, एक कावळा जखमी झाला. तर इतर पक्षीप्रेमींनीही पक्ष्यांची मांजातून सुटका केली. अग्निशमन दलानेही राजीव गांधी भवन जवळील परिसरातून एका पक्ष्याची सुटका केली.
The post Nashik News : नायलॉन मांजाने 21 कबुतरांचा घेतला बळी appeared first on पुढारी.