Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेतील पदभरतीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेत (Nashik ZP)  पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या असून, त्यामध्ये या पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असेसुद्धा म्हटले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने जानेवारीमध्येच रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत.

याबाबत जिल्हा परिषद (Nashik ZP)  अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील संवर्गांचा पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सांमजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

गेल्या चार वर्षांपासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरती प्राधान्याने पूर्ण करावी. तसेच शासनस्तरावर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्यस्थितीचा अंतर्भाव असावा तसेच आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे. परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थी वेळोवेळी चौकशी करत असतात. त्यांना दिशाभूल करणारी उत्तरे जिल्हा परिषदेकडून (Nashik ZP)  दिली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंकानिरसन करण्याकरिता हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन पदभरतीला विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या आधीच भरणार सर्व पदे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 4 मे 2020 च्या शासन निर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र कोरोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला असून, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत.

हेही वाचा : 

The post Nashik ZP : जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.