अंजनेरी शिवारात नाशिकच्या वाहनचालकाचा 6 लाखांचा ऐवज लुटला

crime news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा– नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अंजनेरीनजीक कारचालकाशी मुद्दाम कुरापत काढत लुटारूंनी प्रवाशांना मारहाण करत सहा लाखांचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. रात्री दहा वाजता हा लूटमारीचा प्रकार घडला.

पंकज खंडू जाधव (३६) हे एक एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास त्र्यंबकेश्वर- नाशिक या रस्त्याने कारने चालले असताना अप्पर डिप्पर दिला म्हणून राग मनात धरत समोरच्या इर्टिगा कारमधील आठ ते नऊ अनोळखी लुटारूंनी लोखंडी गज तसेच दगड फेकून मारले. यामध्ये गाडीची पुढची काच फुटली. कार थांबताच पंकज जाधव व सहप्रवासी निखिल ताजणे, निखिल राजाराम कुऱ्हाडे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. पंकज यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळे सोन्याच्या दोन चेन, तर निखिल ताजणे यांच्या गळयातील तीन तोळ्याची सोन्याची चेन व खिशातील 2800 रुपये असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. त्र्यंबक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरला देशभरातून भाविक येतात. यातील बहुतेक जण नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर रात्री प्रवास करतात. या लूटमारीच्या प्रकाराने घबराट निर्माण झाली असून, नाशिक-त्र्यंबक रस्ता प्रवासासाठी असुरक्षित होत चालला आहे. पोलिसांनी या रस्त्यावर रात्रीचे गस्ती पथक ठेवणे आता गरजेचे झाले आहे.

हेही वाचा :

The post अंजनेरी शिवारात नाशिकच्या वाहनचालकाचा 6 लाखांचा ऐवज लुटला appeared first on पुढारी.