अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी, आई वडिलांच्या घामाचं केलं सोनं

चांदवड स्टोरी, www.pudhari.news

चांदवड : सुनिल थोरे

तालुक्यात पाट पाण्याची व्यवस्था नाही, जानेवारी उजाडताच विहीरी तळ दाखवतात, पर्जन्याच्या लहरीपणाचे हिंदोळे त्यात कधी तरी हसवणारा लाल कांदा हे नगदी पीक अन् त्यावरच कुटुंबाची गुजरान अशाही विपरीत परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून मुलाला लढ म्हणून बळ देणाऱ्या रेडगाव खुर्द येथील अल्पभुधारक शेतकरी बापाच्या मुलाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पदाला गवसणी घालून आई वडीलांच्या घामाच सोनं केले आहे.

एकेकाळी आदर्श गावाचा लौकिक लाभलेलं व स्वामी यादव महाराजांच्या कर्म फळाने वारकरी सांप्रदायात चांगले लौकिक पावलेलं गाव म्हणजे रेडगाव खुर्द परंतु दुष्काळाच्या झळा मात्र नेहमीच्याच. अशाही परिस्थितीत हार न मानता अल्पभुधारक शेतकरी उत्तम सावळीराम काळे यानी इतरां प्रमाणे निसर्गाचे हिंदोळे घेत चार मुलींचे लग्न करुन मुलाला अधिकारी होण्यासाठी बळ देण्या खंबीर राहीले. वयाच्या अकराव्या वर्षी पित्रुछत्र हरपल्या नंतर जी शेतीशी नाळ जोडली ती ७६ वर्षात पण कायम आहे. तब्बल ६५ वर्ष म्हणजे नोकरीचा विचार करता दोनदा निवृत्ती इतका काळ कष्टात गेला. वडील उत्तम काळे यांचे ५ वी तर आई ताराबाईंचे ४ थी शिक्षण झालेल्या मातापित्यांचा ऋषिकेश हा सुरवातीपासुनच हुशार, त्याचे प्राथमिक शिक्षण येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण काजीसांगवीच्या जनता विद्यालयात व लासलगावच्या लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात झाले. पुढे १२ वी नंतर के. के. वाघ येथे इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केले. कसे बसे प्राथमिक शिक्षण घेतलेला आई ताराबाई त काही तरी वेगळ करायची धग होती. परंतु पुण्यात जायच म्हणजे आर्थिक तजविज महत्वाची. घरुन तर ती शक्य नाही. मग चार वर्ष खाजगी नोकरी करुन पुण्याकडे प्रयाण केले. जिद्द चिकाटी कठोर परिश्रम या तपस्ये दरम्यान सुरवातील थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. मध्येच कोरोना आला. बरोबरचे मुल स्थिर स्थावर झाले. कुटूंबाला व थेट देखील विचारणा व्हायची अजुन किती दिवस परंतु हे सर्व कडु गोड घोट पचवून २०२२ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत १३१ वा क्रमांक मिळवुन ऋषिकेश उत्तम काळे याने सहाय्यक आयुक्त तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पदाला गवसणी घालून आई वडीलांच्या घामाचे चिज करुन दाखवले. हार मानायची नाही म्हणत लढण्याच बळ देणारांचा विश्वास सार्थ केला. रेडगावसह परिसरीतील एमपीएससी मार्फत थेट वर्ग एक चे अधिकारी पद मिळवणारा रुषिकेश पहीला ठरला आहे. रेडगावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ऱोवला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

मी हुशार होतो, अभ्यास केला मात्र या खडतर प्रवासात आई- वडील, बहीणीचे पाठबळ मला मिळाले. प्राथमिक शिक्षणापासुन यश मिळेपर्यंत उब देणारे शिक्षक सयाजी ठाकरे, गावक-यांच्या विश्वासाच बळ, मित्र या सर्वांचा यशात वाटा आहे. संयम, चिकाटी, धीर खुप महत्वाचा आहे. – ऋषिकेश काळे

लहान पणापासुन ऋषि हुशार होता. त्याने अधिकारी होऊन एक दिवस माझ्या खुर्चित बसावे अशी इच्छा होती. माझा विद्यार्थी एक अधिकारी झाला याचा खुप आनंद व अभिमान वाटतो. नोकरी केल्याच समाधान वाटते. – सयाजी ठाकरे, प्राथमिक शिक्षक

ऋषिकेश हा गावातील जि. प. च्या प्राथमिक शाळेत दुसरीत शिकत असताना गावाची निवड थोरसमाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या संकल्पनेतील आदर्श गाव निर्मिती साठी झाली होती. त्या पार्श्वभुमीवर तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी इक्बालसिंंग चहल यांनी 17 जानेवारी 1996 रोजी गावाला भेट देतांना शाळेची पाहणी केली. त्यावेळेचा त्यांचा रुबाब, इतर अधिका-यांची लगबग हे कुतूहलतेने न्याहळणा-या ऋषिकेशचे बाळाचे पाय पाळण्यात या न्यायाने तत्कालीन शिक्षक व सध्या पुन्हा येथे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत असलेले सयाजी ठाकरे यांनी रुषि ला तुला असे अधिकारी व्हायचे आहे म्हणुन स्वप्नाची पेरणी केली. तेव्हापासुन आज तागायत हे प्राथमिक शिक्षक त्याच्या संपर्कात राहुन त्याला बळ देत राहीले. बालवयात पाहीलेले स्वप्न तब्बल 28 वर्ष जपुन त्याने सत्यात उतरविले. मुलाच्या यशाने खुप बरं वाटतय, कष्टाचं चिज झाल्याच्या भावना ऋषिकेश चे वडील उत्तम काळे व आई ताराबाई  यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा :

The post अल्पभुधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी, आई वडिलांच्या घामाचं केलं सोनं appeared first on पुढारी.