नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खा. हेमंत गोडसे यांचा मॉर्फ व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करीत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खा. गोडसे यांचे कार्यालयीन प्रमुख अमोल जोशी यांनी सायबर पोलिसांकडे ही फिर्याद दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खा. गोडसे हे एका महिलेसमवेत ‘पॅसिव्ह स्मोकिंग’ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही बाब गोडसे यांना समजल्यानंतर त्यांनी याची चौकशी केली असता, तो व्हिडिओ मॉर्फ केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचे कार्यालयीन प्रमुख अमोल जोशी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, फेसबुकवर अतुलराजे भवर नामक खातेधारकाने व व्हाॅट्सॲपवरील ‘योद्धा ग्रुप’मध्ये मोबाइलधारकाने हा व्हिडिओ व्हायरल करीत खा. गोडसे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यातील संशयित भवर हा शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या संंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध सुरू आहे. नागरिकांनीही कोणत्याही व्हिडिओची खातरजमा केल्याशिवाय तो व्हायरल करू नये. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना नोटीस बजावल्या जात आहे. – रियाज शेख, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.
विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खालच्या दर्जाचे राजकारण केले आहे. व्हिडिओ मॉर्फ केलेला असून, यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. – खा. हेमंत गोडसे.
हेही वाचा:
- ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’; शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे नाव
- Stock Market Updates | RBI MPCच्या निर्णयापूर्वी सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला
- नाशिक : शेकडोंच्या उपस्थितीत वीरपुत्र हेमंत देवरेंना अंतिम निरोप
The post आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.