इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा

बडगुजर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेने(ठाकरे गटा)ची जोमाने बांधणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून गद्दारांना धडा शिकविण्याचा निर्धार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इगतपुरी येथे व्यक्त केला.

इगतपुरी तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे नवनियुक्त लोकसभा संघटक विजय करंजकर, जिल्हाप्रमुख बडगुजर यांचा सत्कार राजाराम साळवी मंगल कार्यालयात करण्यात आला. यावेळी बडगुजर बोलत होते. ते म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटातील गद्दारांच्या कारभारास लोक वैतागले असून यावेळी त्यांना परिवर्तन हवे आहे. नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला पोषक वातावरण आहे. जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या पदरातच सर्व जागा पडतील असा विश्वास व्यक्त करत त्या दृष्टीने रणनिती आखण्यात आल्याचेही बडगुजर यांनी स्पष्ट केले. लोकसभा संघटक करंजकर यांनी आपल्या भाषणात पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. अनेक तोलामोलाचे उमेदवार असतांनाही नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांनी अर्थपूर्ण राजकारण करून पक्षाशी गद्दारी केल्याने जनता त्यांना कदापि माफ करणार नाही आगामी निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, असा इशारा करंजकर यांनी दिला. दत्ता गायकवाड, वसंत गिते, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर ईगतपूरी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, माजी आमदार निर्मला गावित, तालुका प्रमुख भगवान आडॊळे, युवासेना जिल्हाधिकारी राहूल ताजनपूरे, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, आदी उपस्थित होते. विल्होळी, वाडीवऱ्हे, घोटी, गोंदेदुमाला, मुंढेगाव आदी ठिकाणीही नूतन पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

हेही वाचा:

The post इगतपुरीतील ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटावर बडगुजरांचा निशाणा appeared first on पुढारी.