जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

रोड pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

नाशिक पश्चिम विभागातील जुना सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या १८ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बसस्थानक, पोलिस परेड ग्राउंड, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, बीएसएनएल कार्यालय तसेच विविध खासगी आस्थापना, शॉपिंग सेंटर व बँका आहेत. हा रस्ता कॉलेजरोड, महात्मानगर यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता गंगापूर रोड, त्र्यंबक रोडला समांतर असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. २०१३-१४ मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. सद्यस्थितीत हा रस्ता पाणीपुरवठा, ड्रेनेज विभागाने जलवाहिन्या, मलवाहिका टाकण्यासाठी तसेच स्मार्ट सिटी विभागाने व विविध कंपन्यांनी वेळोवेळी खोदल्याने रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते. मात्र पावसाळ्यात पुन्हा रस्ता खराब होतो. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून आयडियल रस्ता म्हणून विकसित करण्याची योजना आहे.

काय होता वाद?
२५ कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या या आयडियल रस्त्याकरिता महापालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तत्कालीन आयुक्तांनी दोन कोटींचीच टोकन रकमेची तरतूद केली होती. त्यामुळे लेखा विभागाने आक्षेप घेतल्याने या रस्त्याचा प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जात नव्हता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी यासंदर्भात विदयमान आयुक्त डॉ. अशोक करंजकर, शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर वाढीव रकमेला आयुक्तांची मान्यता घेऊन प्रस्तावाचा मार्ग खुला करण्यात आला.

असा होणार आयडियल रोड
जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा १८ मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण क्षमतेने ‘आयडियल रोड’ म्हणून विकसित केला जाणार आहे. या अंतर्गत १४ मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता तयार केला जाईल. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन मीटर रुंदीचा फूटपाथ असेल. तसेच रोड दुभाजक, पावसाळी, सर्व्हिस लाइन, पाणीपुरवठा लाइनसाठी डक्ट निर्माण केले जातील. आकर्षक पथदीप उभारले जातील. शहराचा प्रमुख राजमार्ग म्हणून हा रस्ता विकसित करण्याची योजना आहे.

हेही वाचा:

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.