इच्छुक उमेदवारांचा बीपी हाय! पदवीधर- शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

शिक्षक निवडणूक pudhari.news

मालेगाव : नीलेश शिंपी

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 4 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल असे अपेक्षित असताना तो ऐन उन्हाळी सुट्टीत जाहिर झाल्याने निवडणूक उमेदवारांचे प्रचार प्रसार नियोजन गडबडले आहे. उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा बंद असल्याने पाच जिल्ह्यातील 54 तालुक्यातील जवळपास पाच हजार शाळेतील 65 हजार मतदारांच्या होम-टू-होम भेट घेणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी ईच्छुक उमेदवारांकडून केली जात आहे.

निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या 4 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. तर 13 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. सद्या उन्हाळी सुट्टी असल्याने सर्वच शाळा बंद आहेत. याच कालावधीत उमेदवारांना निवडणूक प्रचार, गाठीभेटी यांना निवडणूक आयोगाने संधीच दिली नसल्याने इच्छुक उमेदवारांचा बीपी हाय झाला असून निवडणूक कार्यक्रम राज्यातील शाळा सुरू झाल्यावर घेण्याची मागणी होत आहे.

धुळे, नाशिक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुक 20 मे रोजी असल्याने शिक्षक निवडणूक कर्तव्यात व्यस्त असल्याने इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करणे शक्य होणार नसल्याची देखील अडचण आहे. निवडणूक टक्केवारी देखील कमी होण्याची शक्यता आहे. मे महिन्यातील कडक उन्हाळा पाहता शिक्षक मंडळींचे जुन महिन्यात कुटुंब सहलींचे आयोजन असते व त्यासाठी एप्रिल मध्ये नियोजन व बुकिंग झालेले असते. त्याचा ही परिणाममतदानावर होण्याची शक्यता आहे.

राज्यात लोकसभा निवडणुक जून च्या पहिल्या आठवड्या पर्यंत असल्याने विधान परिषद निवडणूक या कालावधीत लागल्याने गोंधळ झाला आहे. निवडणूक आयोगास या मतदारसंघात 100 टक्के मतदान होणे अपेक्षित असेल तर निवडणूक जून अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी. उमेदवारांना सर्व शाळा व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही ईच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ
एकूण मतदार – 64,786
महिला मतदार -20,582
पुरुष मतदार – 44,204

जिल्हा निहाय मतदार
नाशिक – 23,668
नंदुरबार – 4607
अहमदनगर – 14,985
धुळे – 8297
जळगाव – 13,2292018 मधील एकूण मतदार – 53,892

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक अधिसूचना 15 मे स प्रसिद्ध होणार आहे. 15 ते 22 मे पर्यंतच्या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. 24 मे ला अर्ज छाननी होणार आहे. 27 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. 10 जून ला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. 13 जून ला मतमोजणी होईल. 18 जून पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

हेही वाचा –