जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रमजान पर्वाचे महिनाभर रोजे ठेवल्यानंतर मुस्लीम बांधवांनी गुरुवारी (दि.११) शहरात ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी केली. शाहजहानी ईदगाह मैदानात खतीब-ए-शहर हाफिज हिसमोद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वात हजारो मुस्लिमांनी ईदची विशेष नमाज अदा केली. नमाजनंतर खुतबा वाचन करून ‘या अल्लाह; हमारे मुल्क हिंदोस्तान को तरक्की अता फरमा’ अशी विशेष प्रार्थना (दुआ) करण्यात आली. दुरुद-व-सलाम व फातेहा पठणानंतर मुख्य सोहळ्याची सांगता झाली. ईदगाह मैदान शुभ्र कपड्यांतील हजारो मुस्लिमांनी व्यापले होते. अबालवृद्धांनी एकमेकांची गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मैदानावर पोलिसांतर्फे उभारण्यात आलेल्या मंडपातून खासदार हेमंत गोडसे, पोलिस उपायुक्त किरण चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, माजी आमदार राजाभाऊ वाजे, सुधाकर बडगुजर, माजी महापौर दशरथ पाटील, वसंत गिते, विनायक पांडे, भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदींनी जनसमुदायाला ईदच्या शुभेच्छा दिल्यात. महिलांनी घरीच नमाजपठण केले.
नूरी मिशनतर्फे नमाज वेळापत्रक
ईद-उल-फितरचे विशेष नमाजपठण ईदगाहबरोबर मशिदींमध्ये होत असते. परंतु सर्व मशिदीत एकाच वेळी नमाज होत नाही. साधारणतः सकाळी ८ पासून टप्प्याटप्प्याने नमाज होते. कुठे ८.३० तर कुठे ९ असे नियोजन असते. मुस्लीम बांधवांना विशेष नमाजपठण सोयीस्कर व्हावे, यासाठी नूरी मिशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मशिदींमध्ये होणाऱ्या नमाजचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. ईदगाह येथील मुख्य सोहळ्यापूर्वीच सर्व मशिदींमध्ये ईदची नमाज अदा होते.
दर्गा, कब्रस्तानला भेट
मुख्य नमाजपठण झाल्यानंतर बडी दरगाह येथील हजरत सय्यद पीर सादिक शाह हुसैनी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जहाँगीर कब्रस्तान व रसूलबाग कब्रस्तान येथे पूर्वजांच्या कबरींवर फातेहा पठण व प्रार्थना करीत पुष्पार्पण करण्यात आले. दर्गा व कब्रस्तान बाहेर फुलांची दुकाने थाटली होती.
दरवळला शिरखुर्म्याचा सुगंध
ईदच्या दिवशी घराघरांत तयार होणारा खास पदार्थ म्हणजे शिरखुर्मा. अगदी लहान ते मोठे सर्वांनाच ईदच्या नमाजनंतर शिरखुर्माचे आकर्षण असते. महिलावर्ग त्याची सकाळीच तयारी करतात. त्यानुसार सकाळसत्रानंतर आप्तस्वकीय, मित्र परिवारासमवेत शीरखुर्मा पार्टी रंगल्या.
हेही वाचा:
- नाशिक : शहरात रमजान ईदचा उत्साह, शाहजहानी ईदगाह मैदान सज्ज
- Ramadan 2024 | स्पेशल मालपुवा रमजानचे आकर्षण
- सलमान खानने दिल्या ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा !
The post ईद-उल-फितर : नमाजपठण...'हमारे मुल्क हिंदोस्तान को तरक्की अता फरमा' appeared first on पुढारी.