कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्रांबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गोंधळ आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे कोरे लेटरहेड व्हायरल झाल्याच्या घटना ताज्या असतानाच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तपासणी करायची की अनुभव प्रमाणपत्रासाठी जिल्हा परिषदेच्या खेटा घालायच्या, की वेतन मिळविण्यासाठी भांडायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिनस्त जिल्हाभरात एकूण २९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये सध्या २५४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, ३९ जागा रिक्त आहेत. २५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १९८ हे कायमस्वरूपी आहेत. तर ५६ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार पात्रतेनुसार वेतननिश्चिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एमबीबीएसच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ७० हजार रुपये, तर बीएएमएसच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये इतके वेतन आहे. हे वेतन राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे येते आणि तेथून शासकीय कोषागारातून यांना मिळत असते.

या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतन मिळालेले नसल्याने हे वैद्यकीय अधिकारी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहीती एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे यावर जिल्हा आरोग्य अधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहेत.

हेही वाचा :

The post कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत appeared first on पुढारी.