काँग्रेसचे ‘वोट जिहाद’, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

उद्धव ठाकरे, दिनेश शर्मा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांच्या अपमानाची मालिकाच सुरू केली आहे. आता तर लव जिहाद, भू जिहाद पाटोपाठ मुस्लिमांना ‘वोट जिहाद’चा नाराही काँग्रेसने दिला आहे. सत्तेसाठी काँग्रेसशी अभद्र युती करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘वोट जिहाद’चा हा नारा मान्य आहे का, असा सवाल उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शर्मा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गुरूवारी त्यांनी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत सुपर वॉरिअर्सच्या बैठका घेतल्या. यानंतर भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटासह शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला.

शर्मा म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसाठी चांगले वातावरण आहे. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढला आहे. महायुतीतील सर्वच घटकपक्षांनी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदावर बसविण्याचे ध्येय अंगीकारले असून त्यादिशेने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. त्याचेच फलित म्हणून महाराष्ट्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडलेल्या सर्वच १३ जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होईल. तिसरा टप्पा देखील भाजपसाठी शुभशकून ठरेल. ४०० पारच्या घोषणेपूर्तीच्या दिशेने महायुतीची वाटचाल सुरू आहे, असा दावा देखील शर्मा यांनी केला.

काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. तर कसाबला फासावर लटकविण्यासाठी लढणाऱ्या सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांना भाजपने मुंबईतून उमेदवारी देत देशाप्रती आपली कर्तव्यभावना व्यक्त केली आहे. मात्र, देशातील सर्वाधिक जनसंख्या असलेल्या हिंदू समाजाच्या भावनेशी काँग्रेसचे नेते खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आता मुस्लिमांना ‘वोट जिहाद’ करण्यास सांगितले आहे. कधी काळी हिंदूत्वाचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून आता हिंदू शब्द हरवला आहे. त्यांनी हिंदुत्वाशी जणू फारकत घेतली आहे. आता काँग्रेसच्या या वोट जिहादचे समर्थन ते करणार का, असा सवालही शर्मा यांनी केला. यावेळी भाजप आमदार सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, प्रवक्ते गोविंद बोरसे आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –