परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क 
रप्रांतीय व्यावसायिकांनी मोबाइल साहित्य विक्रीबरोबरच दुरुस्तीतही शिरकाव केल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा राहिला असून, त्यात आता मनसेनी उडी घेतली असून शुक्रवार (दि.२२) रोजी राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलकच फाडण्यात आले. स्थानिक मराठी व्यावसायिकांचे मोबाइल दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, आता परप्रांतीयांनी साहित्य विक्रीबरोबरच मोबाइल दुरुस्तीचेही काम हाती घेतल्याने, स्थानिकांचा रोजगार बऱ्यापैकी ठप्प झाला आहे.

नाशिकच्या एम जी रोडवरील मोबाईल मार्केट स्थानिक आणि परप्रांतीय वादामुळे एकाधिकारशाही चालणार नसल्याचे मनसेनी परप्रांतीयांना बजावून सांगितल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.१९) दुकाने बंद ठेवत हेकेखोरपणा दाखवून दिला होता. त्यामुळे ७० ते ८० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. आज शुक्रवार (दि.२२) रोजी मार्केट उघडताच मनसेकडून आक्रमक पवित्रा घेत राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक फाडण्यात आले. राजस्थानी व्यापाऱ्यांचे एमजी रोडवर सुमारे २५० मोबाईल रिपेअर, स्पेअरपार्ट आणि नवीन मोबाईलची दुकाने स्थायिक आहेत. जिल्हाभरातील मराठी मोबाईल व्यावसायिक येथे राजस्थानी व्यापाऱ्यांकडून होलसेल भावात मोबाईल ऍक्सेसरीज खरेदी करतात. मात्र एका मराठी व्यावसायिकासोबत झालेल्या वादानंतर राजस्थानी व्यापाऱ्यांनी एकत्र येत त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे नाशिकमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद रंगला आहे.

परप्रांतीयांविरोधात मनसेंनी पुन्हा अमराठीचा मुद्दा हाती घेतला
आज शुक्रवार (दि.२२) रोजी दुपारी मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी थेट एम जी रोड गाठले. परप्रांतीयांविरोधात मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक मनसेकडून फाडण्यात आले आहे. राजस्थानी व्यापारी स्थानिक मराठी व्यापाऱ्यांवर अन्याय करत असल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. मनसेकडून फलक फाडण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी, परप्रांतीय व्यावसायिकांच्या वादात पोलिसांची उडी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी परप्रांतीयांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (दि. २१) मराठी व्यावसायिकांना बोलावून त्यांनाही शांततेच्या मार्गाने वाद मिटविण्याच्या सूचना दिल्या. मराठी व्यावसायिकांनी पोलिसांना वस्तुस्थिती समजावून सांगत, परप्रांतीय व्यावसायिकच मुजोरी करीत असल्याच्या तक्रारी केल्या. दरम्यान, परप्रांतीय आणि वाद हे समीकरणच झाले असून, परप्रांतीयांच्या या मुजोरीचा नाशिककरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परप्रांतीय आणि स्थानिक व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली असून लवकर संयुक्त बैठक घेणार आहे.

The post परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक appeared first on पुढारी.